Maratha Morcha Kolhapur Live : मराठा मोर्चाला सुरुवात, संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल

एमपीसी न्यूज :  मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे.  

आज सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं.

सर्वच जण काळ्या पोशाखात

यावेळी सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात आले होते. स्वत: संभाजीराजेही काळ्या पोशाखात आले होते. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क लावला होता. सरकारचा निषेध करण्यासाठीच सर्वांनी काळा पोशाख परिधान केला होता. तसेच आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं होतं.

नागरिक म्हणून मोर्चात

मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

आंबेडकरांच्या एन्ट्रीने तर्कवितर्क

कोणतीही कुणकुण नसताना प्रकाश आंबेडकर या मोर्चात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीराजे आंबेडकरांना भेटले होते. त्याचवेळी आंबेडकरांनीही मोर्चात येण्याचं ठरलं होतं असं सांगितलं जातं. मध्यंतरी संभाजीराजे यांनी नव्या राजकीय पक्षाचे संकेत दिले होते. त्यामुळे आंबेडकर आणि संभाजीराजे राज्यात नवं राजकीय समीकरण निर्माण तर करणार नाही ना याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.