Chinchwad News : तारांगण प्रणालीच्या माध्यमातून होणार आकाशदर्शन

एमपीसी न्यूज – आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रीड कॉन्फिगरेशन सिस्टमद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळणे शक्‍य होणार आहे. तसेच खलोलशास्त्रातील शिक्षक व विद्यार्थी यांना खगोलशास्त्राची सर्व माहिती या तारांगण प्रणालीच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. 

खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अनेकांना आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे.अनेकजण खगोलशास्त्राचा अभ्यास करू लागले आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरिकांना खगोलशास्त्राची इत्यंभूत माहिती मिळावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे चिंचवड येथील सायन्स पार्कच्या बाजूलाच तारांगण प्रकल्प उभारला आहे.

या प्रकल्पाचे काम मार्च 2018 रोजी सुरू करण्यात आले होते. जपान, टोकिओ येथील ठेकेदाराने या प्रकल्पाचे काम केले आहे.या कामासाठी 10 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, काम सुरू करण्यास विलंब झाला.त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे आणखीनच विलंब होत गेला. तारांगण प्रकल्पाच्या या कामासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली.तब्बल पाच वर्षांनी हे काम आता पूर्ण झाले असून 11 कोटी 12 लाख 43 हजार रुपयांचा तारांगण प्रकल्पासाठी खर्च करण्यात आला आहे.

तारांगण प्रकल्पाविषयी माहिती देताना महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्‍यामसुंदर बनसोडे म्हणाले, तारांगण प्रकल्पात 15 मीटर व्यासाचा एक अर्धगोलाकृती डोम (ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल) उभारण्यात आला आहे. या डोमच्या माध्यमातून आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष पाहता येणार असून आकाश दर्शन करत असल्याचा नागरिकांना अनुभव येणार आहे.एकाच वेळी 120 नागरिक हे डोम पाहू शकतात.याठिकाणी दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी एक 180 आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

जूनमध्ये याचे उद्‌घाटन होणार होते. मात्र, काही कारणास्तव पवार यांचा शहर दौरा रद्द झाला आणि या प्रकल्पाचे उद्‌घाटन रेंगाळले.त्यानंतर 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवीस सरकार आले.या नवीन सरकारला दोन महिने होत आले. पण, जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही.त्यामुळे प्रकल्पाचे उद्घघाटन कोणाच्या हस्ते करायचे असा प्रश्न आहे. त्यातच आयुक्तांची बदली झाली.नवीन आयुक्त आले.त्यामुळे उद्घाटन आणखी काही दिवस रखडण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.