Pune : साईबाबांच्या संदेशाला पुढे नेण्याचा भाविकांनी प्रयत्न करावा – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – श्री साईबाबा हे तर ब्रम्हांडनायक ईश्वराचे मानवी रुप आहे, सर्व मानवजातीला त्यांनी प्रेम, श्रध्दा, भक्ती, सबुरी व मानवतेचा संदेश दिला. त्यासाठी सर्वांनी साई बाबांचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक भाविकांनी करावा, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आळंदी येथे व्यक्त केले.

आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात  श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान श्री साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव साजरा  करण्यात आला. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील मुख्य कार्यक्रम महोत्सावाचे उद्‌घाटन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, डॉ. चंद्रभानू सत्पथी, श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, शिवकुमार नेलगे, प्रतिष्ठानचे सभासद  आदी उपस्थित होते.

ते म्हणाले की, सत्य – धर्म – शांती, जात – पात व प्रेमाच्या आधाराने वागल्यास आपल्या सर्वांचा व देशाचा उत्कर्ष होऊ शकेल. सत्य नेहमी आचरणात आणा. सर्व धर्म समान असून इतर घर्मांचा आदर करा. अहंकार सोडून द्या. साई बाबा देवस्थानसाठी जी काही मदत लागेल ती सरकारच्या माध्यमांतून करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

दिलीप कांबळे म्हणाले, साई बाबांनी दिलेल्या मार्गाने चला. आजचा योग चांगला आहे. सकाळी शिर्डीतील मुख्य मंदिरातून साई बाबांचे दर्शन घेतले. व संध्याकाळी आळंदीतील साई बाबांच्या मंदिरात दर्शन घेतले. याला दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. जाती-पातीच्या धर्मापलीकडे जाऊन साई बाबांनी सर्व समाजाला एकत्र येण्याचा संदेश दिला. साई बाबांनी दिलेल्या मार्गावर सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करा.

डॉ. चंद्रभानू सत्पथी म्हणाले की, साई भक्ताने कोणत्याही कामात स्वतमध्ये उच जीवनमूल्यांची वृध्दी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण नेहमी सदाचरण आणि सचोटीचीच कास धरावी. ईश्वर हीच सेवा आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगात व्यावसायिक, वैयक्तिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असो सहिष्णुता, करुणा, सचोटी, त्याग आणि वैराग्य यांचे पालन केले पाहिजे. साई बाबांच्या दिलेल्या संदेश सर्वांनी पाळावा.

महापौर राहूल जाधव म्हणाले, बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. शिर्डीप्रमाणे आता आळंदीतील साई बाबा मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष नेलगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.