Somatne Fata Traffic : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमाटणे फाटा येथे केले वाहतूक नियमन

सोशल मिडीयावर पोस्ट टाकत काढले केंद्र सरकारला चिमटे

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Somatne Fata Traffic) शनिवारी (दि. 18) सायंकाळी सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनतर त्यांनी खासदार म्हणून जनतेच्या सेवेचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन केले. याबाबत त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करत केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी झाल्याने स्वतः उतरून ती दूर करण्याचा प्रयत्न केला. पुणे-नाशिक हायवेवरील बायपास आपल्या प्रयत्नांतून सुरू झाले असले तरी अजून खेड ते नाशिक फाटा दरम्यान आणि पुणे-नगर हायवेवरील वाघोली ते शिरूर दरम्यान इलिव्हेटेड कॉरिडॉर झाला नसल्याने जनतेला रोज नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

हे इलिव्हेटेड कॉरिडॉर व्हावे, यासाठी आपण सातत्याने संसदेत आवाज उठवत आहोत. त्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व NHAI कडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आपल्या प्रयत्नांतून याकामी अनुक्रमे 9 हजार कोटी आणि 11 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पण अजून प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही.

Maval : भरधाव कार ओढ्यात कोसळली; नेरे दत्तवाडी येथील डॉक्टरचा मृत्यू

मी मायबाप जनतेच्या या रोजच्या त्रासाकडे केंद्र सरकारचे सातत्याने लक्ष वेधत आहे. पण म्हणावी तशी गती या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मिळत नाही. आज सोमाटणे फाटा येथे तशीच परिस्थिती होती. मग ट्रॅफिक पोलीस बांधवांना मदत म्हणून आणि खासदार या नात्याने जनतेच्या सेवेचा प्रामाणिक प्रयत्न रस्त्यावर उतरून सुद्धा केला.

येत्या काळात संसदेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, ते त्याच जोमाने सुरू ठेवणार, असे आश्वासन देखील डॉ. कोल्हे यांनी आपल्या पोस्टमधून दिले आहेत.

सोमाटणे फाट्यावरील वाहतूक कोंडी नित्याची

जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. सोमाटणे फाटा येथून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी रस्ता आहे. जुन्या महामार्गाने मावळ, लोणावळा आणि पुढे मुंबईला जाणारी वाहतूक तसेच द्रुतगती मार्गाकडे जाणारी वाहतूक एकत्र आल्याने चौकात दररोज वाहतूक कोंडी होते.

याच चौकात खरेदीसाठी देखील नागरिक येत असल्याने गर्दीत आणखी भर पडते. त्यामुळे दररोज इथे लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. सोमाटणे फाटा चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात (Somatne Fata Traffic) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.