Maharashtra News : शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली जारी

एमपीसी न्यूज :  कोरोना संकट कायम असल्याने 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी होणारी शिवजयंती यंदा साधेपणाने साजरी करा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे यंदा शिवजयंतीला कोणत्याही मिरवणुका तसेच बाईक रॅली काढता येणार नसल्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.

शिवजयंती दिनी शिवनेरी, रायगड तसेच अन्य किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा शिवजयंती गड किल्ल्यावर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी 10 पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सदर कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने म्हटले आहे.

प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना अंतर नियमांचे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसे आवाहन करावे, असे गृह विभागाने नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.