Nigdi : सुरेल गायनाने रंगली प्राधिकरणात दिवाळी पहाट

मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुपतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- तुझे गीत गाण्यासाठी…… जीव रंगला, दंगला… पहिले न मी तुला…. माझे माहेर पंढरी….अशा एकापेक्षा एक गाण्यांनी दिवाळी पहाट रंगली. निमित्त होते मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुप प्रस्तुत स्वरपहाट….. दिवाळी पहाट 2018 चे. या कार्यक्रमाचे हे 13 वे वर्ष आहे. माजी उपमहापौर स्थायी समिती सदस्य राजू मिसाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात हृषीकेश रानडे यांनी गायलेल्या ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गाण्याने करण्यात आली. त्यानंतर अभिलाषा चेल्लम हिने गायलेल्या मी ‘राधिका मी प्रेमिका’, ‘अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले’ या गाण्यांनी तसेच आनंद भाटे यांच्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा….. रम्य ही स्वर्गाहुनी लंका… माझे माहेर पंढरी……अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. योगिता गोडबोले यांनी सादर केलेल्या ‘गोऱ्या गोऱ्या गालावर चढली लाली…. ‘ ‘स्वप्नात दंगले मी…. ‘या गाण्यावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. हृषीकेश रानडे यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमात केदार परांजपे (सिथेसायझर), निलेश देशपांडे (बासरी), नितीन कुलकर्णी (गिटार), प्रसाद जोशी (तबला), केदार मोरे, (ढोलक, पखवाज), अभय इंगळे (वेस्टर्न रिदम), पराग माटेगावकर (हार्मोनियम आणि संगीत संयोजन) यांनी साथसंगत केली. मयुरेश साने याच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली.

सेक्टर 26 मधील गजानन महाराज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती सदस्य अमित गावडे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघीरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर,  माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, निलेश पांढरकर, प्रसाद शेट्टी तसेच संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.