Talegaon Dabhade News : साहित्य निर्मितीसाठी अपार परिश्रमाची गरज – विश्वास पाटील

एमपीसी न्यूज – कुठल्याही साहित्य निर्मितीला अपार जिद्द, कष्ट व अविरत परिश्रमाची गरज भासते. प्रत्येक लेखक त्याची कलाकृती सजगतेने साकार करतो. इतिहास समजून घेताना व्यक्तिगत चरित्राचा, जडणघडणीचा आणि त्याच्या महानतेचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असते. या साऱ्या कलाकृती साकारताना परिवर्तनवादी संवेदनशील घेऊनच लिहिलं तर समाजाला आत्मभान मिळतं, असे प्रतिपादन इतिहासकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या संत तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेतील ‘ मी माझे साहित्य – पानीपत ते आण्णाभाऊ’ याविषयीवरील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी सतीश दिघे होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उद्योजक गणेश काकडे, विशाल जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष निखिल भगत, सचिव डॉ. वर्षा वाढोकर, आशिष खांडगे, डॉ. मिलिंद निकम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, ॲड. रंजना भोसले, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सोपान खुडे, डॉ. अनंत परांजपे, डॉ. रवी आचार्य , माजी नगरसेवक संतोष शिंदे, संदीप काकडे, हरिश्चंद्र गडसिंग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची लेखणी अतिशय दर्जेदार अशी कडाडली. रात्रीची जागरण करून अण्णा भाऊ साठे यांनी अनेक प्रेरणादायक गीते लावण्या आणि पोवाडे गायले. खऱ्या अर्थी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधले ‘दि फरगटन हिरोज’ म्हणून त्यांचा उल्लेख करता येतो.

पानिपत कादंबरी लिहिताना ‘ पानिपत ‘ मधला अनुभव त्यांनी कथन केला.’ झाडाझडती’ साकारताना भूमिहीन शेतकऱ्यांची कैफियत माणुसकीचा गाहिवरांतून मांडता आली. महानायक या कलाकृतीसाठी जपानमध्ये जाऊन तिथल्या माणसांची स्पंदने टिपता आली. संभाजी सारख्या महान नायकाची कादंबरी साकारताना संगमेश्वर ते वढू असा सलग सोळा तास पायी भटकंती करताना आलेले अनुभव त्यांनी श्रोत्यांपुढे उलगडून दाखवले .

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. प्रा. गणेश चंदनशिवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘ माझी मैना गावावर राहिली’ ही मुंबईची गाजलेली लावणी ठेक्यात सादर केली. सतीश दिघे, गणेश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश धोत्रे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद निकम यांनी केले, तर अतुल पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.