Pune News : छत्रपतींच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश, सत्ताधारी भाजपच्या मनमानीला दणका – मोहन जोशी

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महापौरांनी तयार केलेल्या फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेस काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. राजमुद्रेचा अवमान रोखण्यात कॉंग्रेसला यश आले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पुणे मेट्रोच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी महापौरांनी खास फेटा तयार करून घेतला होता. त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला होता. राजमुद्रा ही महाराष्ट्राची मानबिंदू आहे. पण महापालिकेतील भाजप आणि महापौरांनी हेतुपुरस्सर राजमुद्रा असलेला फेटा वापरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याची मालिका चालू ठेवली.

पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा करण्याचा हा प्रकार होता. यास काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवून या प्रकाराला विरोध केला. अखेरीस फेट्यावरील राजमुद्रा काढणे भाजपला भाग पडले आणि काँग्रेसच्या लढ्याला यश मिळाले, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या जोरावर मनमानी करणाऱ्या भाजपला काँग्रेसने दणका दिला, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.