T20 WC 2021: इंग्लंड संघाने आठ गडी राखून ऑस्ट्रेलिया संघाला केले नेस्तनाबूत!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – उपांत्यफेरीचे लक्ष्य जवळपास गाठणाऱ्या इंग्लंड संघाने काल त्यांचा लागोपाठचा तिसरा आणि मोठा विजय मिळवताना आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया संघाला चारीमुंडया चित करत सर्वच बाबतीत पिछाडीवर सोडले. तुफानी फटकेबाजी करणारा बटलर तर सामनावीर ठरलेला ख्रिस जोर्डन या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले.

क्रिकेटमधले  दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी, म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातली नेहमीच असणारी खुन्नस ज्याला आवडत नाही असा एकही क्रिकेटरसिक या भूतलावर सापडूच शकत नाही. कधी कांगारू तर कधी इंग्लंड वरचढ असे नेहमीच चित्र असते. यामुळे यांच्यामधील लढती बघायला सर्वानाच उत्सुकता असते.

यावेळी मात्र इंग्लंड संघ जरा जास्तच भरात आहे तर ऑस्ट्रेलियन संघ मात्र तुलनेने कमजोर आहे. इंग्लंड संघाने लागोपाठचे दोन्हीही सामने सहजगत्या जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला  आहे.तर ऑस्ट्रेलिया संघाने सुद्धा आपले आधीचे दोन्हीही सामने जिंकल्याने त्यांचा संघ सुद्धा भरात आहे असे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही.

त्यामुळे आतापर्यंत एकदाही यास्पर्धेत पराभूत न झालेल्या या दोन पैकी कोणत्या एका संघाला आज पराभवाची चव चाखावी लागेल याची उत्सुकता सर्वानाच होती.

ग्रुप ए च्या आजच्या दुसऱ्या आणि एकून 25 व्या सामन्याला आज दुबईच्या मैदानावर सुरुवात झाली,ज्यात इंग्लंड कर्णधार आयन मॉर्गनने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात कर्णधार अरॉन फिंच आणि मागील सामन्यात धडाकेबाज खेळ केलेल्या डेविड वॉर्नरने केली,पण वॉर्नरला ते सातत्य आज दाखवता आले नाही आणि तो डावाच्या आठव्याच चेंडूवर केवळ 1 धाव काढून ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेलबाद झाला.

या धक्क्यातून सावरण्याआधीच स्टिव्ह स्मिथ सुद्धा जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला,यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठाच हादरा बसला आणि याच दडपणाखाली त्यांच्या आणखी तीन विकेट्सही गेल्या.12व्या षटकाखेर ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था 5 गडी बाद 51 अशी नाजूक झाली होती ,आणि वॉर्नर सह स्मिथ,खतरनाक मॅक्सवेल, मॅथ्यू वेड असे एकसे बढकर एक 20/20मधले महारथी तंबूत परतले होते.

मैदानावर एकटा कर्णधार एकाकी लढत होता,त्याने अँष्टॉन आगर सोबत 47 धावांची भागीदारी करून डाव सावरला खरा,पण धावा फारच मंदगतीने होत होत्या, त्यामुळे धावगती वाढवणे गरजेचे झालेले होते,याच दडपणाने कांगारू फलंदाज हतबल झाले आणि याचाच फायदा घेत ख्रिस जॉर्डनने फिंच व कमिन्सला लागोपाठच्या चेंडूवर बाद करत आणखी एक घाला घालत ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था पारच अवघड करून टाकली.

मात्र स्टार्कने शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करून संघाला कसाबसा सव्वाशे धावांचा टप्पा गाठून दिला.इंग्लंड कडून जोर्डनने तीन तर मिल्स व वोक्सने दोन दोन गडी बाद केले.ऑस्ट्रेलिया संघाला कर्णधार फिंच सोडला तर एकही तारणहार न मिळाल्याने कसेबसे 125 चे लक्ष्य उभे करता आले.

आपल्या विजयी कामगारीत सातत्य ठेवण्यासाठी आणि उपांत्यफेरीतला प्रवेश करण्यासाठी इंग्लंडला 126 धावा हव्या होत्या. त्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जोस बटलर ही आक्रमक जोडी मैदानावर आली तर मिशेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन आक्रमण सुरू केले.

इंग्लिश सलामीजोडीने तुफानी हल्ला चढवत आधीच सोपे असलेले आव्हान आणखीनच सोपे करून टाकले.जेसन रॉयच्या तुलनेत बटलर फारच आक्रमक होता,त्याच्या घणाघाती फलंदाजीने इंग्लंड संघाने पहिल्या पॉवर प्ले मध्ये बिनबाद 66 धावा चोपल्या होत्या.

या आक्रमक फलंदाजीने कांगारू सैरभैर झाले होते पण पॉवरप्ले नंतरच्या पहिल्याच षटकात ऍडम झम्पाने जेसन रॉयला वैयक्तिक 22 धावांवर बाद करून ही जोडी फोडली.पण याने बटलरला काहीही फरक पडला नाही त्याने आक्रमक अंदाजात आपली 15 वी आणि स्पर्धेतली सर्वात जलद अर्धशतकी खेळी पूर्ण केली.

अर्धशतक झाल्यानंतरही त्याने तोच धडाका कायम ठेवला आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो नाबाद तंबूत परतला.त्याने केवळ 32 चेंडूत घणाघाती नाबाद 71 धावा काढताना पाच चौकार आणि तेवढेच उत्तुंग षटकार मारत ऑस्ट्रेलिया संघाला दे माय धरणीठाय  केले.त्यांच्यासाठी एकच सुखकर बाब ठरली ती म्हणजे त्यांनी किमान डेविड मलानला तरी स्वस्तात बाद केले,पण हे ही सुख त्यांना बेअरस्टोने भोगू दिले नाही.

त्यानेही उरलेसुरले घाव घालत झम्पाला दोन उत्तुंग षटकार मारत संघाला 12व्या षटकाच्या आतच तब्बल आठ गडी राखून आणखी एक मोठा विजय मिळवून दिला.बटलरचा हा 20/20क्रिकेटमधला सर्वोच्च स्कोअरही आहे.

या विजयाने इंग्लंड संघाचे उपांत्यफेरीचे स्थान जवळजवळ पक्के झालेले आहे तर आजच्या या मानहानीकारक पराभवाने ऑस्ट्रेलिया संघाला अंकतालिकेत तिसऱ्या स्थानावर ढकलून दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या क्रमांकावर विराजमान केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.