T20 WC 2021: टी-20 मधला सर्वोच्च विजय मिळवत भारताने केली स्कॉटीश संघाची शिकार; चार गुण मिळवून अफगाणिस्तान टाकले मागे

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – टी-20 मधला सर्वोच्च विजय मिळवत भारताने काल (शुक्रवारी) स्कॉटलंड संघाची अक्षरशः शिकार केली. त्याचबरोबर टी-20 विश्वचषक स्पर्धेत चार गुण मिळवून भारताने गुणतालिकेत अफगाणिस्तानला मागे टाकले.

आधी खराब खेळ करून आपली प्रतिष्ठा पणाला लावायची आणि मग चाहत्यांनी रोष व्यक्त करताच जबरदस्त मुसंडी मारत पुन्हा गळ्यातला ताईत व्हायचे, ही खासियत आपल्या संघाची झालीय. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून दणदणीत पराभूत झाल्यानंतर विश्वकप स्पर्धेत भारताला कायम नडणाऱ्या किवी संघाकडूनही तसाच मानहानीकारक पराभव झाल्याने भारतीय संघावर तमाम जुन्या नव्या क्रिकेटपटूपासून रसिकांनी जहाल टीका केली.

यातून धडा घेत भारतीय संघाने परवानगी अफगाणिस्तान संघाला चारी मुंडया चित केल्यानंतर आजही नवख्या स्कॉटलंड संघाला दणदणीत पराभूत करून अष्टपैलू खेळ करत विजयी लक्ष्य केवळ 37 चेंडूत गाठताना आपला निव्वळ रनरेट अफगाणिस्तान संघापुढे नेऊन ठेवला आहे.

अर्थात आपल्याला उपांत्यफेरीतले स्थान गाठण्यासाठी अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करणे गरजेचेच आहे,तसेच व्हावे अशीच अपेक्षा तमाम भारतीय रसिकांना आहे आणि  त्या प्रेमाला  सार्थ जागत भारतीय संघाने आज सर्वांगसुंदर खेळ करत आपला 20/20 मधला सर्वांत मोठा विजय प्राप्त करताना नवख्या स्कॉटलंड संघाला शब्दशः चिरडले आधी गोलंदाजीने आणि नंतर तुफानी फलंदाजीने.

आपल्या 33 व्या वाढदिवशी खूप दिवसांनी कोहलीने  नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराह ,शमी आणि जडेजाने कर्णधार कोहलीचा हा निर्णय एकदम योग्य ठरवताना स्कॉटिश फलंदाजीला जराही स्थिरावू दिले नाही.मूनसी, लीस आणि मॅकलिओंड हे तिघेच दुहेरी धावसंख्या करू शकले. त्यामुळे स्कॉटलंड संघाचा डाव अठराव्या षटकाच्या आतच 84 धावात गारद झाला.

बुमराहने आज दोन गडी बाद करताना 20/20 मध्ये सर्वाधिक विकेट(६६) मिळवणारा पहिला  भारतीय गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवला,तर जडेजाने केवळ 15 धावा देत तीन गडी बाद करून आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातूनच प्रेरणा घेत मोहम्मद शमीने सुद्धा जोरदार गोलंदाजी करत तीन बळी मिळवले.

भारताला विजयासाठी 85 धावांचे तर धावगतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आणि अफगाणिस्तान संघाहुन धावगती सरस करण्यासाठी हा विजय 7.1 षटके म्हणजेच 43 चेंडूत मिळवणे गरजेचे होते, संघनीतीच्या व्युव्हरचनेनुसार रोहीत आणि राहुलने अफगाणिस्तान संघाविरुद्ध केलेल्या धडाकेबाज खेळालाच पुढे चालू ठेवत स्कॉटलंड गोलंदाजावर तुफानी हल्ला सुरू केला, ज्यामध्ये ते भरकटत गेले.

राहुलने चक्क रोहितहून सुंदर आणि अधिक आक्रमक फलंदाजी करताना केवळ 18 चेंडूत आपले वेगवान आणि या विश्वकरंडक स्पर्धेतले वेगवान अर्धशतक पूर्ण केले. ज्यामध्ये तीन उत्तुंग षटकार आणि 6 चौकार होते,तर रोहीतने सुद्धा आकर्षक फलंदाजी करताना 16 चेंडूत 30 धावा करताना 5 चौकार आणि एक षटकार मारला.

हे दोघेच संघाला अपेक्षित विजय अपेक्षित चेंडूच्या आत मिळवून देतील असे वाटत असताना दोघेही बाद झाले पण तोपर्यंत विजय भारतीय संघासाठी अगदी हाकेच्या अंतरावर आला होता. ते काम कर्णधार कोहली आणि सूर्यकुमार यादवने पूर्ण करत 43 ऐवजी केवळ 39 चेंडूतच मिळवून देत 20/20 क्रिकेट मधला आपला आजपर्यंतचा सर्वात मोठा विजयही मिळवला. ज्यामुळे भारतीय संघ आपल्या गटात तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे तर निव्वळ धावगतीमध्ये आज त्याने अफगाणिस्तान संघालाही मागे टाकले आहे.

एवढे सगळे मनासारखे झाले असले तरी भारतीय संघाला उपांत्यफेरीचे लक्ष्य अद्यापही सोपे नसल्याचे कटू वास्तव आहे. त्यांना उपांत्यफेरीत प्रवेश  करण्यासाठी आता अफगाणिस्तान संघाला न्यूझीलंड  संघाविरुद्ध विजय मिळवावा, अशीच अपेक्षा असणार आहे. आपली सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय संघाला अविस्मरणीय विजय मिळवून देणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.