Worldcup 2023 : दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या 83 धावांत गारद, भारताचा तब्बल 243 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज:(विवेक कुलकर्णी)बर्थडे बॉय किंग कोहलीच्या विश्वविक्रमी 49व्या शतकाच्या (Worldcup 2023)जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका संघापुढे 327 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते ज्याला उत्तर देताना या सामन्याआधीच उपांत्यफेरीत प्रवेश करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाची भेदक भारतीय गोलंदाजी पुढे पुरती दाणादाण उडाली आणि त्यांचा डाव केवळ 83 धावांतच गारद झाला,हा आफ्रिका संघाचा विश्व कप स्पर्धेतला सर्वांत नीचांकी स्कोअर आहे.

ज्यामुळे भारतीय संघ 243 धावांच्या मोठ्या फरकाने विजयी झाला, या विजयाबरोबरच भारतीय संघाने आपला 8 वा विजय प्राप्त करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.आपल्या 35 व्या वाढदिवशी विश्वविक्रमी शतक करुन महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकाच्या विक्रमाची बरोबरी करणाऱ्या विराट कोहलीच सामन्याचा मानकरी ठरला.

Maharashtra – मतदान केंद्रावर ह्रदयविकाराचा झटक्याने मतदाराचा मृत्यू

भारतातल्या सर्वात मोठया आणि ऐतिहासिक अशा कोलकाताच्या(Worldcup 2023) ईडन गार्डनवर नाणेफेकीचा कौल लागण्यानंतर रोहित शर्मा प्रथम फलंदाजी घेणार हे कोणालाही अनपेक्षित नव्हतेच आणि प्रथम फलंदाजी करताना रोहित स्फोटक फलंदाजी करणारच हे ही खात्रीपूर्वक सांगता येईल असेच वादादित सत्य होते झालेही अगदी तसेच. रोहीतने पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी सुरू केली आणि संघाला नेहमीप्रमाणेच शानदार सुरुवात करून दिली.केवळ 24 चेंडूत दोन उत्तुंग पण तितकेच देखणे षटकार आणि 6 खणखणीत चौकार मारत त्याने घणाघाती 40 धावा केल्या, पण आजही तो या देखण्या आणि स्फोटक खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करु शकला नाही. पण त्याने बाद होण्याआधी 36 चेंडूत 62 धावांची शानदार सलामी रचून संघालाही शानदार सुरवात करून दिली.

तो बाद होताच मैदानावर टाळ्यांच्या कडकडाटात उतरला तो बर्थडे बॉय आणि किंग कोहली.आक्रमकता आकर्षकता,जबरदस्त मनोनिग्रह आदीचे सुरेख प्रदर्शन करणारी एक अविस्मरणीय खेळी करत त्याने आजचा आधीच खास असलेला दिवस आणखीनच खास करत त्याला विक्रमाचा बादशहा का म्हणतात हे सप्रमाण सिद्ध केले. दुसऱ्या बाजूने खेळत असलेला गील आपल्या त्याच चिरपरिचित शैलीत आलाय आणि संपूर्ण भरात आलाय असे वाटत असतानाच केशव महाराजच्या एका अप्रतिम चेंडूवर चकला आणि निराश होत तंबूत परतला.

मात्र त्याच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने आजही आणखी एक अप्रतिम खेळी करत संघाला सावरलेच पण त्याचबरोबर सुस्थितीतही आणून ठेवले. पहिल्या 26 चेंडूत केवळ 10 धावा काढणाऱ्या श्रेयसने नंतर जनता गाडीला एक्सप्रेसचे रूपडे लेववत एक अतिशय सुंदर खेळी केली, त्यामुळे संघाला तर गती मिळालीच,पण त्याच्या या फलंदाजीमुळे विराटवर जराही दडपण आले नाही, अगणित प्रेक्षकांच्या अपेक्षेचे ओझे तो मागील एका तपाहुन अधिक काळ झेलत आलाय म्हणा,त्याला कसले आलेय दडपण ,पण तरीही श्रेयसने केलेल्या खेळीचे मोल शब्दात मांडणे शक्य नाही, मात्र तो आजही शतकी खेळी करण्यात अयशस्वी ठरला.

त्याने 87 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकार मारत 77 धावा केल्या, आणि त्याचसोबत विराटसह चौथ्या गडयासाठी 134 धावांची शानदार भागीदारीही केली. त्यानंतर आलेल्या के एल राहुलला आज मात्र विशेष काही कामगिरी करता आली नाही. तो फक्त 8 धावा काढून बाद झाला,पण त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने छोटी पण नेहमीप्रमाणेच स्फोटक खेळी करुन संघाला मोठया धावसंख्येची आस दाखवली.

तो भरात आलाय असे वाटत असतानाच डीकॉ कच्या एका शानदार झेलामुळे तो 22 धावा काढून तंबूत परतला, पण मैदानावर उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांना त्याचे फारसे दुःख झाले नाही ,कारण यावेळी मैदानावर होता किंग कोहली. जागतिक विक्रमाला तो गाठत असताना त्याचे साक्षीदार होणाऱ्या अनगिणत प्रेक्षकांनी याची देही याची डोळा आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे काय ते आज खरोखरच अनुभवले.

फक्त 277 डावात 49 शतक करणाऱ्या विराटने आजच्या त्याच्या 35 व्या वाढदिवशी आपल्या आयडॉल असलेल्या सचिन रमेश तेंडुलकरला गाठले आणि आपले नाव त्याच्याबरोबर सुवर्णअक्षरात गोंदले.आकडेवारी सर्व काही सिद्ध करत नाही हे मान्य केले तरी सचिनला हे शतके करण्यासाठी 450 हून अधिक सामने लागले होते हे आवर्जून सांगावे वाटते.महान खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने 452 सामन्यात 49 शतके केली होती, तर कसोटीत 51 शतके करुन जगातला पहिला शतकांचा शतकवीर हा बहुमान पटकावला होता, जो आजही अबाधित आहे.

त्यातल्या एकदिवसीय सामन्यातल्या 49 व्या शतकाच्या विक्रमा ची बरोबरी आज कोहलीने केली.आपल्या वाढदिवशी हे विक्रमी शतक करणाऱ्या कोहलीने आज असंख्य क्रिकेट रसिकांना परमोच्च आनंद दिला.त्याला साथ द्यायला आलेल्या जडेजाने अतिशय आक्रमक अंदाजात केवळ 15 चेंडूत नाबाद 29 धावा केल्याने भारतीय संघ आपल्या निर्धारित 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या, ज्याच्या जोरावर भारतीय संघ आजही आपल्या विजयी मार्गाने शानदार प्रवास करता राहिल असेच वाटत होते .कोहलीने 121 चेंडूत 10 चौकार मारत नाबाद 101 धावा केल्या.दक्षिण आफ्रिका संघाकडून रबाडा आणि केशव महाराज यांनी त्यातल्या त्यात किफायतशीर गोलंदाजी केली,पण त्यांचे बाकीचे गोलंदाज खूपच महागडे ठरले.

या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात अतिशय खराब झाली, या स्पर्धेत सातत्याने शानदार खेळ करणाऱ्या डीकॉकला मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकातल्या चौथ्या चेंडूवर साफ चकवत त्रिफळाबाद करत आपल्या संघाला मोठे यश मिळवून देताना आफ्रिका संघाला मोठा धक्का दिला. आणि या धक्क्यातून सावरण्याआधीच जडेजाने कर्णधार बवूमाला 11 धावांवर असताना त्रिफळाबाद करुन आणखी एक मोठा धक्का दिला, आणि हे कमी की काय असे वाटावे असे काम करत शमीने खतरनाक मार्करमला चकवत राहुलच्या हातून बाद केले आणि आफ्रिका संघ पुरता खिंडीत सापडला.

यावेळी त्यांची अवस्था 10व्या षटकाखेरीस 3 बाद 35 अशी झाली होती.आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरलेला आफ्रिका संघ काही तरी चमत्कार करेल असे वाटत होते खरे, पण भेदक भारतीय गोलंदाजी पुढे इतर संघाविरुद्ध धावांची रास रचणाऱ्या आफ्रिका संघाची या भेदक गोलंदाजीमुळे पडझड सुरु झाली.खतरनाक क्लासेनला जडेजाने तर व्हॅनडरसेनला शमी ने पाठोपाठ बाद करुन आफ्रिका संघाचा अर्धा संघ तंबूत पाठवून त्यांचा डाव पुरता संकटाच्या खाईत लोटला.

त्यांचा खरा कर्दनकाळ ठरला तो अष्टपैलू रवींद्र जडेजा. आतापर्यंत या स्पर्धेत म्हणावी तितकी प्रभावी गोलंदाजी न करु शकलेल्या जडेजाने आज मात्र अतिशय भेदक अशी गोलंदाजी करत आफ्रिकन डावाची पुरती दैना उडवली.त्याने आज अतिशय किफायतशीर आणि भेदक गोलंदाजी करत विश्व कप स्पर्धेतली आपली सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्यांदा पाच गडी बाद केले, विशेष बाब म्हणजे अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच फिरकी गोलंदाज ठरला,याआधी युवराज सिंगने अशी कामगिरी केली होती, दुसऱ्या बाजूने त्याला कुलदीप यादवनेही उत्तम साथ देत इंगीडीला ही त्रिफळाचित केले आणि याबरोबरच आफ्रिका संघाचा डावही गारद झाला.

इतर संघाविरुद्ध 300 हून अधिक धावा करणाऱ्या आफ्रिकन संघाला आज 100ही गाठता आली नाही आणि त्यांचा डाव केवळ 83 धावांतच गारद झाला आणि भारतीय संघाने आफ्रिका संघाला 243 धावांच्या मोठ्या फरकाने मात देत आपला सलग 8 वा विजय प्राप्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.