Pune Crime News : बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी किरण गोसावीवर पुण्यात तिसरा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बहुचर्चित ड्रग्स पार्टी प्रकरणातील प्रमुख पंच असलेल्या किरण गोसावी विरोधात पुण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने पैसे परत मागण्यास गेलेल्या तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचे समोर आले आहे. त्याला यापूर्वीच फसवणूकीच्या गुन्ह्यात फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात किरण गोसावी, त्याची एक सहकारी आणि किरण गोसावीचा मालक या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 48 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व्यक्ती आणि त्याच्या दोन मित्रांना आरोपींनी परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. 55 हजार रुपये पगार मिळेल असे खोटे आश्वासन देखील त्यांना दिले होते. त्यासाठी व्हीजा, हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा मिळवून देण्यासाठी फिर्यादीकडून एकूण 1 लाख 45 हजार रुपये घेतले. मात्र त्यांना नोकरी लावली नाही. त्यांना परदेशात जाण्यासाठी अडचणी निर्माण केल्या.

त्यानंतर फिर्यादी हे किरण गोसावी च्या कार्यालयात गेले असता आरोपीने पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावले. नोव्हेंबर 2018 ते 2021 या कालावधीत हा घडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.