T20 WC ( IND Vs AFG ) :  महत्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाला गवसला सूर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – मानहानीकारक पराभवाने चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या भारतीय संघाला आज योग्य वेळी सूर गवसला आणि त्यांनी अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय साफ चूकीचा ठरवत तब्बल 210 धावांचा मोठा डोंगर उभा करून अफगाणिस्तान संघाला मोठे आव्हान दिले.

प्रतिष्ठा पणाला लागलेल्या टीम इंडियाची आजची लढत अफगाणिस्तान संघासोबत होती. हाराकरी करून आपले दोन्हीही सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर प्रचंड दडपण होते. अर्थात ते त्यांनीच खराब खेळ करून आणलेले असल्याने आता त्यांनाच यातून मुक्त होण्यासाठी एकमेव मार्ग काढावा लागणार होता तो म्हणजे जबरदस्त मुसंडी मारून खेळ करणे.

दुर्दैवाने आजही कोहलीला नाणेफेकीचा कौल जिंकता आला नाही. अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकताच भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघनीतीच्या या विचित्र निर्णयाचा फटका मात्र बिचाऱ्या ईशान किशनला बसला आणि त्याच्या जागी सुर्यकुमार यादव तर अखेर टीम मॅनजमेंटला अश्विनला संघात घ्यायची उपरती झालीच.

या दोन बदलासह कोहलीच्या संघाने आपल्या डावाची सुरुवात करताना मागील सामन्यात केलेल्या चुका टाळून रोहित आणि राहुल यांना सलामीला पाठवले आणि त्यांनी बऱ्यापैकी सुरूवात आज तरी करून दिली. धावगती म्हणावी तशी वेगवान नसली तरी वाईटही नव्हती. पहिल्या पॉवरप्ले अखेरीस बिनबाद 53 नंतर रशीद गोलंदाजीस आल्यावर धावगतीला आणखी खीळ बसली.

त्यामुळेच दहा षटकानंतर भारताच्या 85 धावा झाल्या होत्या.पण एकही विकेट गेली नसल्याने दोन्ही सलामीवीर मुक्तपणे खेळत होते. यांनी आपली चौथी 20/20 मधली शतकी भागीदारी नोंदवली. यामुळे या दोघांचा आत्मविश्वास दुणावलेला होता. बघताबघता दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धंशतक नोंदवले. रोहितचे 23 वे तर राहूलचे 13 वे टी/20मधले अर्धशतक आज या खेळीदरम्यान आले.

अर्धशतकी खेळीनंतर दोघेही जोरदार खेळायला लागले होते. रोहितचा आजचा खेळ बघता तो मोठ्या खेळीकडे सहज वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच रोहितची खेळी जन्नतने संपवली. रोहितने 47 चेंडूत 74 धावांची खेळी करताना त्याने तीन षटकार आणि आठ चौकार मारले. त्यातले दोन तर रशीदच्या एकाच षटकात मारलेले होते पण त्यांची पहिल्या विकेटसाठी 140ची विक्रमी भागीदारी झाली होती.

रोहीत बाद झाल्यानंतर पंत खेळायला आला. त्याने राहुलसोबत पुढे आक्रमण सुरू केले पण संघाच्या धावसंख्येत 7 धावांची भर पडलेली असतानाच राहुल सुद्धा वैयक्तिक 69 धावा करून गुलबदीनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर मात्र कोहलीने स्वतः ऐवजी पंड्याला पाठवून संघहिताला प्राधान्य दिले. जे पंड्याने संपूर्णपणे सार्थ ठरवत तिसऱ्या गड्यासाठी केवळ 21 चेंडूत 63 धावांची नाबाद भागीदारी करताना या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या उभारली.

पंत आणि पंड्याने जबरदस्त फलंदाजी करताना 5 चौकार आणि तेवढेच षटकात मारत 210 ही विशाल धावसंख्या उभी करून अफगाणिस्तान पुढे मोठे लक्ष्य ठेवले. दरम्यान, पंत 13 बॉल्स मध्ये 27 तर पंड्या तेवढ्याच चेंडूत 35 धावा करून नाबाद राहिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.