T20 world Cup: अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेला 71 धावांच्या मोठ्या फरकाने नमवत भारत उपांत्य फेरीत दिमाखात दाखल

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आजच्या दिवसातल्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त उलटफेर झाल्यानंतर भारतीय संघाचे (T20 world Cup) उपांत्य फेरीतले स्थान पक्के झाले होतेच, त्यामुळे भारतीय समर्थक खुश झालेले होतेच,अन दुधात साखर पडावी तशी सूर्यकुमार, के एल राहुल, रवीचंदन अश्विन यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने आपल्या अंतिम सामन्यात तुलनेने दुबळ्या पण कधीही कोणालाही धक्का देण्याची क्षमता असलेल्या झिम्बाब्वे संघाला71 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करत अतिशय शानदाररित्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

आजच्या सामन्यात (T20 world Cup) भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहीतची आजही फलंदाजी बहरली नाही.तो फक्त 15 धावा काढून तंबूत परतला,रोहीतचे अपयश संघाला अद्याप तरी अडचणीत आणणारे नसले तरी आता पुढील सामन्यासाठी ते नक्कीच काळजी वाढवणारे आहे. रोहीत बाद झाल्यानंतर आला तो विराट कोहली. या स्पर्धेत त्याची कामगिरी जोरदार होत असली तरी आज मात्र त्याची बॅट फारशी तळपली नाही. मात्र त्याने के एल राहुलला उत्तम साथ देत रोहीतच्या झटपट बाद झाल्यानंतर आलेल्या दडपणाला बऱ्यापैकी कमी केले. 25 चेंडूत 26 धावा करुन विराट बाद झाला तेंव्हा भारताची धावसंख्या दोन बाद 87 अशी होती. विराटने राहूल सोबत दुसऱ्या गड्यासाठी 62 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.त्यानंतर आला खेळायला तो सुर्यकुमार यादव.

सूर्यकुमारने एक जबरदस्त खेळी करताना झिम्बावेच्या गोलंदाजावर तुफानी हल्लाबोल करत भारतीय संघाला सुरक्षित धावसंख्याही गाठून दिली. याच दरम्यान के एल राहुल सुद्धा दुसऱ्या बाजूने चांगले खेळत होता. दोघांनीही आपापले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले .राहुल अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच बाद झाला अन त्यानंतर लगेचच आज अंतिम संघात स्थान मिळालेल्या पंतनेही आपली20-20 मधली खराब कामगिरी पहिल्या पानावरुन पुढे चालू ठेवली मात्र सुर्यकुमारने एक अविश्वसनीय खेळी करताना भारतीय संघाला एक मोठी अन आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. त्याला हार्दिक पंड्याने बऱ्यापैकी साथ दिली,त्यामुळेच भारताने आपल्या निर्धारीत20 षटकात 6 गडी गमावून 185 धावा जमा केल्या, ज्या विजयासाठी नक्कीच पुरेशा होत्या.सुर्यकुमार यादव 61 धावा करून नाबाद राहिला, ज्या केवळ 25 चेंडूतच आल्या होत्या.त्याने सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकारही मारले. राहुलने 35 चेंडूत 51 धावा काढल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाची सुरुवात अतिशय खराब झाली.अनुभवी भुवनेश्वरने पहिल्याच चेंडूंवर मधवेरेला कोहलीच्या हातून झेलबाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले.तर युवा अर्शदीपनेही आपल्या पहिल्याच षटकात चकाबवाला बाद करुन दुसरे यश मिळवून दिले.

या धक्क्याने झिम्बाब्वे संघाला सावरता येणार नाही याचा अंदाज भारतीय संघाला होताच. त्यांच्यावरच्या दडपणाचा अचूक फायदा उठवत अनुभवी शमीने आपली करामत दाखवत झिम्बाब्वे संघाची अवस्था चार बाद 31 अशी करुन टाकली. यानंतर गोलंदाजीची कमान हार्दिक पंड्या आणि रवीचंद्रन अश्विन यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेत झिम्बाब्वे संघाला एकापाठोपाठ एक धक्के देत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रायन बर्ल आणि सिकंदर रझा यांनी थोडीफार झुंज दिली पण ते कधीही सामन्याचा निकाल बदलवू शकतील असे वाटलेच नाही. ही जोडी बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या मोठ्या विजयाची औपचारिकता अक्षर पटेलने पूर्ण केली अन भारतीय संघाने तब्बल 71 धावांच्या मोठ्या फरकाने झिम्बाब्वे संघाला पराभूत करुन साखळी फेरीतली आपली दिमाखदार कामगिरी तशीच जोरदार ठेवली.

दक्षिण आफ्रिका संघाकडून मिळालेला एकमेव पराभव सोडता भारतीय संघाने आपल्या चारही सामन्यात (T20 world Cup) विजयश्री प्राप्त केलेली आहे.या विजयासह भारतीय संघ आपल्या गटात आणि एकूणच सर्व संघातही सर्वाधिक 8 गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान होता.आता उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय संघाची लढत इंग्लंड विरुद्ध तर लॉटरी लागल्यासारखी नशिबाने दिलेल्या साथीच्या जोरावर पाकिस्तान संघानेही बांगलादेश संघाला नमवत उपांत्य फेरीतला आपला प्रवेश पक्का केला आहे.दक्षिण आफ्रिका संघाला नेहमीप्रमाणे महत्वाच्या सामन्यात खराब कामगिरी करणारा संघ(चोकर्स)या वारंवार होणाऱ्या टिकेला खोटे ठरवता आले नाही अन आज त्यांनी तुलनेने दुबळ्या अशा नेदरलँड संघाकडुन पराभूत होत आपल्याला चोकर्स का म्हणतात हेच जणू सिध्द केले.

त्यांच्या पराभवाने पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळाली, त्यात पाकिस्तान संघ वरचढ ठरला आणि त्यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना येत्या 9 तारखेला न्यूझीलंड संघाविरुध्द होणार आहे.तर भारतीय संघाची लढत इंग्लड संघाविरुद्ध 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.यावेळी उपांत्यफेरीत प्रवेश केलेल्या चार पैकी फक्त न्यूझीलंड संघ सोडला तर बाकी तिनही संघांनी एकेकदा विश्वकप स्पर्धा जिंकलेली आहे.

क्रिकेट मध्ये भविष्य वर्तवले जात नाही असे म्हणतात ,पण तरीही यावेळेस अंतीम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात व्हावा अशी आशा अगणित क्रिकेटरसिक बाळगून आहेत ,तुम्हीही त्यातलेच एक आहात ना?

एक तुफानी खेळी करणारा सुर्यकुमार यादव आजच्या सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
भारत 5 बाद 186

  • राहुल 51,
  • कोहली 26
  • पंड्या 18,
  • सुर्यकुमार यादव नाबाद 61

विजयी विरुद्ध झिम्बाब्वे सर्वबाद 115

  • सिकंदर रझा 34,
  • रायन बर्ल 35
  • अश्विन 22/3,
  • पंड्या 18/2,
  • शमी 14/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.