Talegaon : मायमर मेडिकल कॉलेजच्या बांधकाम परवानगीची चौकशी करावी; माहिती अधिकार मंच तळेगाव दाभाडे यांची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या परिसरात मायमर मेडिकल कॉलेज (माईस) या संस्थेने विनापरवाना आणि बेकायदेशीर टोलेजंग इमारत उभारली आहे. या इमारतीच्या बांधकामाची सक्षम अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार मंच तळेगाव दाभाडे अध्यक्ष तथा नगरसेवक अरुण माने यांनी केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने बेकायदेशीर बांधकामाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांना पत्र दिले आहे. त्यावर पोलिसांनी पुराव्यांसोबत सक्षम अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले आहे.
तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलच्या परिसरात सुरू असलेल्या मायमर मेडिकल कॉलेजच्या इमारतीबाबत माहिती अधिकार मंच तळेगाव दाभाडे यांनी माहिती मागवली. त्यामध्ये हॉस्पिटल प्रशासनाने तसेच महाविद्यालय प्रशासनाने इमारतीच्या बांधकामाबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे माहिती माहिती अधिकार मंच तळेगांव दाभाडे अध्यक्ष तथा नगरसेवक अरुण बबनराव माने, माहिती अधिकार कार्यकर्ता जमीर नालबंद, किरण साळवे, सूर्यकांत बोऱ्हाडे यांनी दिली.

तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या परिसरात मायमर मेडिकल कॉलेज संस्थेने हजारो चौरस मीटर परिसरात परवानगीशिवाय तसेच बेकायदेशीर बांधकाम केले आहे. ही बाब माहिती अधिकारा अंतर्गत मिळालेल्या कागद पत्रावरून स्पष्ट झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार मंचाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेला बेकायदेशीर बांधकाम संदर्भात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी तक्रार अर्ज दिले होते. त्या तक्रार अर्जातील मुद्याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने चौकशी करून, प्रत्यक्ष बांधकामाचा पंचनामा करून  बेकायदेशीर बांधकाम काढून टाकणे बाबत संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. या नोटिसांना न जुमानता संस्थेने बांधकाम चालूच ठेवले. त्यानंतर माहिती अधिकार मंचच्या पाठपुराव्यामुळे नगर परिषदेने मायमर मेडिकल कॉलेज वर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आठ दिवसाची मुदत दिली.
त्यानंतर देखील संस्थेने नोटिसांची कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी शनिवारी (दि. 17) मायमर मेडिकल कॉलेजवर बेकायदेशीर व बिगर परवानगी बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला पत्र दिले. नगरपरिषदेने दिलेले पत्र दाखल करत पोलिसांनी तळेगांव दाभाडे नगरपरिषदेला सक्षम अधिका-यांना पुराव्याची कागदपत्रे घेऊन हजर होण्याचे पत्राद्वारे सांगितले, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.