Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज – गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन घटनांपैकी दोन घटनेनमधील आरोपी एकच आहेत असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

आज, बुधवारी सकाळी चंदन नगर परिसरातील आनंदनगर पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये महिलेवर घरात घुसून गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव एकता ब्रिजेश भाटी असे आहे . मारेकरी हे उघड्या दरवाजातून आत आले, आणि गोळीबार करून पसार झाले. अशी माहिती तिचे पती ब्रिजेश भाटी यांनी पोलिसांना दिली. फायरिंगचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी गर्दी केली होती. भर दिवसा झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. ब्रिजेश भाटी आणि परिसरातील नागरिकांकडे कसून चौकशी करत आहेत. तसेच सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीचा शोध सुरू आहे.

दुसरी घटना येवलेवाडी परिसरामध्ये घडली . चंदननगरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या अवघ्या 5 तासात येवलेवाडी परिसरात सराफी व्यावसायिकाच्या दुकानात गोळीबार करण्यात आला. गणेश ज्वेलर्स नावाच्या दुकानात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , दरोड्याच्या हेतूने हा गोळीबार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असले, तरीही स्पष्ट कारण अद्याप समजू शकले नाही. या गोळीबारामध्ये गणेश ज्वेलर्स मधील कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दोन घटनांनी पोलीस प्रशासनासमोर तगडे आव्हान उभे केले असताना, पुन्हा अवघ्या तीनच तासात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलीस निरीक्षक गजानन पवार हे जखमी झाले असून , त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळी एकता भाटी महिलेची हत्या करणारे मारेकरी यांचा सीसीटीव्हीच्या आधारे सुगावा लागला . या प्रकरणातील मारेकरी पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना सूत्रांमार्फत समजले.

दरम्यान संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि त्यांच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. या संशयित आरोपींना पकडण्याच्या चकमकीत आरोपींनी निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर या आरोपीनी मंगळवार पेठेच्या दिशेने पळ काढला. दरम्यान स्टेशन समोरील भुयारी मार्गातही त्यांनी गोळीबार केला. या दोन्ही आरोपींना गावळी कट्यासह मालधक्का चौक आणि समर्थ पोलीस स्टेशन जवळ ताब्यात घेण्यात सोमवार पेठ मार्शल कर्मचारी पोलीस शिपाई येवले, पोतलापुरे, तसेच दत्तवाडी पोलीस स्टेशनचे शिपाई बोडरे यांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.