Talegaon Crime News : ‘आयसीयू’मधील कोरोनाबाधित रुग्णाची हॉस्पिटलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज संचालित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड आयसीयू वाॅर्डात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने स्टोअर रुममध्ये वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार (दि. 9) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सोमनाथ तुकाराम हुलावळे (वय 44 रा. कार्ला ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या कोरोना रुग्णाचे नाव आहे. या प्रकरणी दिनेश हनुमंत हुलावळे (वय 33) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हुलावळे यांच्यावर शनिवार (दि. 1) पासून भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात कोविड आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अचानक रविवारी (दि. 9) सकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी टेलिफोन केबलच्या वायरने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, कर्मचारी बाबराजे मुंडे, स्वप्नील चांदेकर आदींनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वामन गेंगजे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर करत आहेत.

नातेवाईक दिनेश हुलावळे यांनी डॉ. भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आमच्या मृत रुग्णाचे बिल न घेता मृतदेह दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आयसीयूमध्ये असलेला रुग्ण आत्महत्या करतो हॉस्पिटल व्यवस्थापन झोपलेलं आहे का ? डॉ. भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या गलथान कारभाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आणखी किती रुग्णांचा बळी गेल्यावर कारवाई होणार, असे सवाल यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. 1) रोजी गणेश लोके (वय 40 रा. मळवली ता. मावळ) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांकडे वैद्यकीय उपचाराचे बिल भरण्यासाठी 59 हजार रुपये नसल्याने तीन दिवस मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आला. हे प्रकरण ताजे असताना, रविवारी (दि. 9) सकाळी कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याच्या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.