Talegaon Dabhade: प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करणाऱ्यांनी नगर परिषद व पोलिसांकडे नोंद करण्याचे आवाहन

तळेगाव दाभाडे – तळेगाव नगरपरिषद परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात ये – जा करणारे नागरिक, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून येणा-या वाहनांची नगरपरिषद तसेच पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांनी नोंद करावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तळेगाव पोलीस स्टेशन यांनी केले आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य व्यक्तींना पुणे तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतून ग्रामीण हद्दीत प्रवेशास बंदी आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरांना रेडझोन म्हणून शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु या दोन्ही शहरांत आपत्कालीन कामासाठी ग्रामीण भाग आणि लगतच्या नगरपरिषद हद्दीतील  अनेक नागरिक ये-जा करीत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील शेतमाल, दूध पुरवठयासह वैद्यकीय आणि पीएमपीएमएल कर्मचारी देखील संचारबंदी काळात वाहनातून ये-जा करीत असतात. या संबंधितांनी नगरपरिषद प्रशासनाकडे आपल्या वाहनांची तसेच आपलीही नोंद करावी.

भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच विनानोंदणी कोणीही प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी माहिती नगरपरिषद व पोलीस प्रशासनास कळवावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. विनानोंदणी असा प्रवास करताना कोणी आढळून आल्यास सदर व्यक्तीस 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

 नोंदणीसाठी तळेगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयंत मदने (मो. नं 9595791904) तसेच तळेगाव नगरपरिषद कार्यालय (02114 – 222449) येथे संपर्क साधावा.  टोल फ्री क्रमांक – 18002332734

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.