Talegaon News: चूक पोलिसांची आणि बदनामी मात्र राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची!

एमपीसी न्यूज : पोलिसांच्या एका नजरचुकीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon News) मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला. ही बातमी प्रसिद्ध होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. अर्थात या प्रकरणी पोलिसांवर लेखी खुलासा करण्याची नामुष्की ओढावली आहे.

त्याचे झाले असे की तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.27) एक तक्रार आली, ज्यामध्ये परवानगी शिवाय फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीवर नांगरण करण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच बातमी पब्लिश झाली अन हा..हा.. म्हणता वाऱ्यासारखी परिसरात व्हायरलही झाली.

मात्र, यात नजरचुकीने एक गोंधळ झाला कारण दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी म्हणून नाव होते. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांचे. खांडगे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक देखील आहेत. त्यामुळे परिसरात त्यांचा चांगला लोकसंपर्क आहे.

खरे पाहता खांडगे व त्यांचे मित्र सुहास गरुड यांची तळेगाव दाभाडे येथे गट क्र.333 व 334 येथे जमीन आहे. त्या जमिनीवर सागर भेगडे याने नांगरण केली होती. मात्र, पोलिसांकडून खांडगे यांचे नाव भेगडे सोबत जोडले गेले अन फिर्यादी असलेले खांडगे आरोपी झाले होते. त्यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली. खांडगे व गरुड यांच्या ही बाब लक्षात येताच गरूड व खांडगे यांनी पोलिसांना याबाबत जाब विचारला.

पोलिसांनी हे नजरचुकीने झाल्याचे स्पष्ट केले. तसे लेखी प्रकटन देखील दिले. मात्र पोलीस तक्रारीत नोंद झाल्याने पोलिसांना ही चूक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, वडगाव न्यायालय, राज्य गुप्त वार्ता विभाग तसेच पोलीस नियंत्रण (Talegaon News) कक्षापर्यंत लेखी कळवावी लागली. चूक लक्षात येताच आरोपीचा फिर्यादी करण्यात आला. पण या ‘ध’ चा ‘मा’ झाल्याने परिसरात काही काळ का असेना चर्चांना उधाण आले आहे.

RSS: ..जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक एका सर्वसामान्य स्वयंसेवकाच्या घरी दोन तास रमतात!

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना सुहास गरुड म्हणाले की, बातमी प्रसारीत झाल्यानंतर आमच्याकडे बातमीची लिंक आली. अनेकांचे फोन आले की गणेश खांडगे यांचे नाव आले आहे. माहिती मिळताच तातडीने तळेगाव दाभाडे पोलिसांना संपर्क साधला तेंव्हा हे नजरचुकीने झाल्याचे पोलिसांनी मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी लेखी स्वरुपात चूक झाल्याची कबुली दिली. तसेच पोलीस हे प्रगटन आता सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात सादर करणार आहेत. कायदेशीर दुरुस्तीसाठी पोलिसांवर आता कोर्टात धावाधाव करावी लागणार आहेत.

पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया गणेश खांडगे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली असली तरी या प्रकारामुळे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे पुन्हा अशा चुका होणार नाहीत, याची दक्षता वरिष्ठ पोलीस अधिकारी घेतील अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.