Talegaon Dabhade : सरकारविरोधातील ‘आक्रोश’ राष्ट्रवादीच्या युवकांना महागात, युवक प्रदेशाध्यक्षांसह 150 जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात करण्यात आलेले ‘आक्रोश’ आंदोलन पदाधिका-यांना महागात पडले आहे. आंदोलनाची परवानगी नाकारली असतानाही गर्दी जमवून आंदोलन करत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत युवक प्रदेशाध्यक्षांसह 150 जणांविरोधात तळेगावदाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.27) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेसवर उर्से टोलनाका येथे घडला होता.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख (वय 32, रा. बीड), कार्याध्यक्ष रवीकांत वरपे (वय 33, रा. पिंपळेनिलख), पुणे जिल्हा समन्वयक राकेश कामठे (वय 32, रा. कोंढवा, पुणे), पुणे शहर युवक अध्यक्ष महेश हंडे (वय 32, शिवाजीनगर, पुणे), चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर (वय 32, रा. वाकड), पुणे जिल्हा युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले (वय 34, रा. मावळ), तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे (वय 46), बाळासाहेब कारके (वय 55, रा. मावळ), युवकचे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते (वय 39, रा. मोहितेवाडी, पुणे), किशोर रसाळ (वय 30, रा. बारामती), अजय आवटे (वय 35, रा. शिवाजीनगर, पुणे), संजय शेडगे (रा. आढले. मावळ), कैलास लिंभोरे (रा. भामाआसखडे), निलेश शिंदे (रा. शिवणे, मावळ), अभिषेक जाधव (रा. शिवाजीनगर, पुणे), सचिन माने (रा. कोथरुड, पुणे), चेतन गावडे (रा. खेड, पुणे), सुरज चव्हाण, अविनाश गराडे, (रा. तळेगाव), विशाल वहिले (रा. वडगाव), अफताफ शेरा, सुधीर घारे, सुनील दाभाडे, दिलीप राक्षे (सर्व रा. मावळ) यांच्यासह 100 ते 125 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस चौकीतील हवालदार राकेश पालांडे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने तयार केलेले महापरीक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणे पोलीस भरती करा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती बेरोजगारी, हायपर लुपच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर आंक्रोश आंदोलन करण्यात आले होते. महामार्ग बंद केला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन करत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), (3) लागू असलेल्या जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच सीआरपीसी 1973 चे कलम 149 प्रमाणे दिलेल्या नोटीसाचा भंग केल्याचा ठपका ठेवत आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.