BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : लोकसभेत परिवर्तनासाठी मावळातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जाहीर मागणी

अजितदादा म्हणाले, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणा !

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – देशात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने युवानेते पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी जाहीर मागणी मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आज केली. त्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. पक्ष देईल त्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी निवडून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित परिवर्तन यात्रेची सभा दुपारी आज तळेगाव दाभाडे येथे झाली. यावेळी पवार बोलत होते.

व्यासपीठावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पवार कुटुंबातील रोहित पवार, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, जयदेव गायकवाड, जालिंदर कामठे, विजय कोलते, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, दीपक हुलावळे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, माया भेगडे तसेच अशोक घारे,आशिष खांडगे, सुनील भोंगाडे, सुनीता काळोखे आदी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी बबनराव भेगडे यांनी प्रास्ताविकात केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, मावळची जागा विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो उमेदवार देईल, त्यालाच निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. तालुक्यातील नेत्यांचे चुकीचे ऐकू नका, असा टोलाही पवार यांनी लगावला.

अजित पवार यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही घेणे-देणे नाही. मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. सरकारची हिटलरशाही चालू आहे. हे सरकार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवू शकले नाही. लोक विकासाला मतदान करतात. शिवसेना राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करत आहेत. या देशात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. युती शासनाच्या काळात राज्यात महिला आणि युवतींवर ५२ टक्के अत्याचार वाढले आहेत. सरकारच्या राजवटीत शेतकरी संपावर गेला. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. 500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची या शासनाने थट्टा चालवली आहे, अशी टीका पवार यांनी केली.

बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करत आहे. सरकार काय करत आहे? सरकारला धडा शिकवता येत नाही का? तुम्ही काही करा, हवं तर कायदा कडक करा. मात्र, अशा मुजोरांना धडा शिकवा. चौकीदार काय करतोय. कामगार उध्वस्त होतोय. धंदे बंद पडलेत. महागाई वाढलीय. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैसेवाल्यांची चांदी झालीय. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. डान्सबार बंदी उठवली. युवकांचे वाटोळे होणार, गुटखा, मटका, अवैद्य धंदे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली. पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर घणाघाती हल्ला केला. माऊली-तुकारामांपेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ होते, असे म्हणण्याचे धाडस संभाजी भिडे कसे करतात आणि आपण ते सहन तरी कसे करतो, असा ते म्हणाले.

त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी शेतकऱ्यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली. हे शासन निवडणुकीवर डोळा ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. पाच राज्यात सत्ता गेली तेव्हा त्यांनी न मागता सवर्णांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले.

  • चहा विकणे वाईट नाही, पण देश विकू नका – भुजबळ
    यावेळी छगन भुजबळ म्हणाले, मनुवाद फोफावतो आहे. संविधान विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे. शेकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. संविधानास तडा गेला तर देश अंध:कारात बुडेल. नोटबंदीमुळे देशातील एक कोटी धंदे बंद झाले. 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचे मोदींनी अश्वासन दिले. प्रत्यक्षात एक तरी स्मार्ट शहर दाखवा. महागाई वाढते आहे. पेट्रोलचा भाव मोदींसाहेबांच्या वयाच्या पुढे गेले आहेत. चहा विकणे वाईट नाही, देश विकू नका. एकही आतंकवादी ठार झाला नाही. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणीत आहे.

न बोलवता पंतप्रधान मोदी पाकिस्तानला गेलेच कसे? 139 देशांची परदेशवारी करून मोदींनी काय साधले? किती देश मित्रपक्ष म्हणून राहिलेत, असा प्रश्न उपस्थित केला. काळा पैसा भारतात आणणार होता त्याचे काय झाले? 2014 मध्ये राममंदिराचा मुद्दा का उपस्थित केला नाही, आजच हा मुद्दा का आला?, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. हिंदू-मुस्लिम यांच्यात हाणामा-या लावण्याचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्र शासनात सत्तेत 45 पक्ष सहभागी चालतात, मग पवारसाहेब मित्रपक्षाची मोट बांधताना इतरांना ते का सलते, असा प्रश्न त्यांनी विचारला.

  • मोदींकडून अच्छे दिनची चेष्टा – धनंजय मुंडे
    यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, देशातील जनता परिवर्तन मागते आहे. देशात अच्छे दिनची चेष्टा चालू आहे. मोदींनी आश्वासन दिलेले 15 लाख कुणाच्या खात्यात जमा झाले आहेत त्यांनी हात वर करावे. एकही हात वर नाही. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या नसत्या तर पेट्रोलने सेंच्युरी गाठली असती. या देशातील तरुणाईला शासनाने फसवले आहे. या देशातील खऱ्या चौकीदारालाही मोदींचे नाव घ्यायला लाज वाटते.

मावळच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी हवे
त्यानंतर बापूसाहेब भेगडे यांनीही केंद्र आणि राज्य शासनावर टीका केली. दोन्ही सरकारांनी घेतलेले निर्णय लोकहिताचे नाहीत. सरकार खोटारडे आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. हे शासन थापाडे आहे. मावळ तालुक्यातील कारखाने खेड तालुक्यात गेले, याला जबाबदार सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हेच आहेत. मावळच्या उज्वल भवितव्यासाठी आणि विकासाची गंगा आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच हवे आहे. गॅस सिलेंडर किती महाग केले, अण्णासाहेब हजारे यांच्या उपोषणावर मोदी सरकारने मागण्या मान्य केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

यावेळी दीपक हुलावळे यांनी आभार मानले.

 

HB_POST_END_FTR-A2

.