Talegaon Dabhade : मावळातील सर्व महिलांसाठी प्रत्येकी दोन लाखांचे मोफत विमा संरक्षण – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मातृदिनाचे औचित्य साधून मावळचे आमदार व राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी तालुक्यातील सर्व महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा मोफत विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. संपूर्ण राज्यात मावळ तालुक्यात प्रथमच ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सर्व माता-भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘करूया मातृत्वाचा सन्मान, तोच आहे मावळचा अभिमान’ या घोषवाक्यासह या विमा योजनेची भेट मावळातील समस्त माता-भगिनींना देण्याचा संकल्प मातृदिनानिमित्त करण्यात आला असल्याचे भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. जनरल विमा पॉलिसी असे या विम्याचे स्वरूप असणार आहे.

भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघर जाऊन या विमा योजनेचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या महिलांना त्यांच्या नावाचे विमा पॉलिसी सर्टिफिकेट घरपोच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक महिलेला अर्जासोबत आधार कार्ड व पॅन कार्डची छायाप्रत आवश्यक आहे.

आधार कार्ड व पॅन कार्ड नसेल तर पर्यायी कागदपत्रांमध्ये जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला, पासपोर्ट अथवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एकाची छायाप्रत, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एकाची छायाप्रत तसेच रहिवासाचा पुरावा म्हणून वीज बिल, कर पावती, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, गॅस पुस्तक यापैकी एकाची छायाप्रत चालू शकेल, अशी माहिती भेगडे यांनी दिली.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकातील भाजप कार्यालय, तळेगाव स्टेशन येथील चाकण रस्त्यावरील राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जनसंपर्क कार्यालय किंवा भेगडे आळीतील विश्वकमल निवास या पैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.