Talegaon Dabhade : संत साहित्यामध्ये कल्पना काशिद यांना पीएच.डी

एमपीसी न्यूज- पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कल्पना साहेबराव काशिद यांना संत साहित्यातील अभ्यासाविषयी पीएच.डी जाहीर केली आहे. काशिद यांनी बालमुकुंद लोहिया सेंटर आॅफ संस्कृत विभागाअंतर्गत मराठी विभागातून ‘संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोकजीवन संदर्भ आणि चिंतन या विषयावर संशोधन पूर्ण केले. संत साहित्यावर अभ्यास करणा-या वारकरी परंपरेतील मावळातील एकमेव महिला ठरल्या आहेत.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधनास नुकतीच पीएच.डी जाहीर झाली आहे. विभागप्रमुख डॉ. श्रीपाद भट, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी काशिद यांना मार्गदर्शन केले.

कल्पना काशिद या भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळसाहेब काशिद यांच्या पत्नी असून कुटुंबातील वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत.
संत तुकाराम महाराजांंच्या अभंगगाथेविषयी डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रामकृष्णदास लहवितकर, डॉ. अशोक कामत, डॉ. दिलीप धोंडगे यांनी संशोधन केले आहे. या संशोधकांनंतर संत साहित्य आणि तुकाराम साहित्यावर अभ्यास करणाऱ्या काशिद या मावळातील एकमेव महिला वारकरी आहेत. संत साहित्यात महिला अभ्यासकांची संख्या कमी आहे. प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून कल्पना काशिद यांनी मराठी विषयातून एम.ए आणि एम.फिल केले होते. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संत साहित्यांवर पीएच.डी पूर्ण केली आहे.

कल्पना काशिद म्हणाल्या, ‘‘मी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी असणा-या इंदोरी या गावात वास्तव्यास असून आमच्या कुटुंबात वारीची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. माझे सासरे आनंदराव काशिद हे भंडारा डोंगरावरील ट्रस्टचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. तसेच सध्या पती बाळासाहेब काशिद हे भंडारा डोंगरावर अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत”

“कुटुंबात असणारी वारकरी पंरपरा पुढे नेणे आणि साहित्य क्षेत्रात अभ्यास करण्याच्या दृष्टीने मी ‘संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोकजीवन: संदर्भ आणि चिंतन हा विषय निवडला. अभ्यास पूर्ण झाला असून शोध ग्रंथास विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी जाहीर केली आहे. ‘संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोकजीवन याचा अभ्यास केला आहे. त्यातून तुकोबांची गाथा, अभंग हे लोकजीवनाशी एकरूप कसे झाले आहेत. गाथा ही जीवन उद्धारक कशी आहे, हेही संशोधनातून मांडले आहे”

हे संशोधन पूर्णत्वास जाण्यासाठी सासूबाई कृष्णाबाई काशिद आणि आई कुसुम आणि वडील जयवंतराव गायकवाड यांनी पाठबळ दिले. त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर संशोधन पूर्ण करण्यास बळ मिळाले.’’ असे काशिद म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.