Talegaon Dabhade : स्वतः ला वाचविण्यासाठी सराईत गुन्हेगाराची विकेट

तळेगाव पोलिसांकडून तिघांना अटक

एमपीसी न्यूज- पूर्व वैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराने एकाला तुझी विकेट काढतो अशी धमकी दिली. धमकीला घाबरत स्वतःला वाचविण्यासाठी त्यानेच साथीदारांच्या मदतीने गुन्हेगाराची विकेट काढली आणि मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. मात्र तळेगाव पोलिसांनी तपासचक्रे फिरवत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मंगेश उर्फ दाद्या अनंता भागवत (वय 38, रा.सोमाटणे, तळेगाव दाभाडे), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी श्रीकांत मुऱ्हे, स्वप्नील हृदयनाथ काळे, प्रवीण ऊर्फ बारक्या रमेश शेडगे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे मुऱ्हे याच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी दोघांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान भागवत याने तुझी विकेट काढणार अशी धमकी मुऱ्हे याला दिली होती. यामुळे मुऱ्हे याला स्वतःचे बरेवाईट होण्याची भीती होती. अखेर त्याने स्वतःच भागवतला संपविण्याची योजना आखली. दोन साथीदारांच्या मदतीने मुऱ्हे याच्या शेतात भागवतला मारहाण करून त्याचा खून केला.

त्यानंतर मृतदेह पवना नदीच्या पात्रात टाकला. 15 एप्रिल रोजी सायंकाळी गहुंजे येथील पवना नदीपात्रामध्ये मृतदेह मिळाला. त्यावर जखमा असल्याने पोलिसांचा घातपाताचा संशय बळावला. दरम्यान मृतदेहावर ओम व आई या गोंदलेल्या शब्दांवरून ओळख पटली. त्यानंतर पुढील तपासात खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार, सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.