Talegaon Dabhade News : स्टेशन पोस्ट ऑफिसचे नव्या इमारतीत स्थलांतर; नगरसेवक निखिल भगत यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिसशी संलग्न असलेल्या वराळे, माळवाडी, आंबी, मंगरूळ, आंबळे, कातवी, निगडे, नवलाख उंब्रे, एमआयडी यांसारख्या सुमारे 10 ते 15 गावांसाठी आनंदाची बाब आहे. तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिस नव्या जागेत स्थलांतरित झाले आहे. या पोस्ट ऑफिससाठी नगरसेवक निखिल भगत यांनी जागा उपलब्ध करून दिली. तसेच पोस्ट ऑफिसच्या इमारतीचे बांधकाम, काऊंटर, काच आणि अन्य बाबी नगरसेवक निखिल भगत यांनी बांधून दिल्या. त्यामुळे अनेक नागरिकांना पोस्ट ऑफिस सेवेचा लाभ घेणे सोयीस्कर होणार आहे.

तळेगाव स्टेशन विभागातील तपोधाम काॅलनी येथे नव्याने सुरू झालेल्या पोस्ट ऑफीसचे काल शनिवारी (दि 16) उद्घाटन झाले.

पूर्वीपासून तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या आवारात तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिस कार्यालय कार्यरत होते. मात्र तळेगाव नगरपरिषदेने केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये ते अनधिकृत म्हणून पाडून टाकण्यात आले होते. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज गाव भागातील पोस्ट ऑफिसमध्ये हलविण्यात आले होते.

स्टेशन विभागातील या ऑफिसवर अवलंबून असलेला स्टेशन परिसर,वराळे,नाणोली,माळवाडी, इंदोरी, आंबी, नवलाख उंब्रे, तळेगाव एमआयडीसी आदी परिसरातील नागरीकांची प्रचंड गैरसोय झाली होती. त्यामुळे ते आता पुन्हा स्टेशन विभागात तपोधाम काॅलनीत स्थलांतरित करण्यात नगरसेवक निखिल भगत यांची मोलाची मदत झाली.

यावेळी पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल मधुमिता दास, प्रमुख पाहुणे म्हणून अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, नगरसेवक निखिल भगत, सामाजिक कार्यकर्ते विश्वास देशपांडे व पुणे जिल्हा ग्रामीणचे डाकघर अधीक्षक प्रमोद भोसले, नगरसेविका कल्पना भोपळे, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी तसेच अरविंद करंदीकर, निरंजन जहागिरदार, अ‍ॅड. संविद पाटील, मधुकर बासरकर, उर्मिला बासरकर, सुरेश झेंड, उद्धव जुंदरे, प्रकाश जोशीसह आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी मधुमिता दास व्यासपीठावरून बोलताना म्हणाल्या की, लोकांच्या कल्याणाच्या अनेक योजना पोस्ट खात्याने आखल्या आहेत. त्या यशस्वी करण्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद होते; परंतु पोस्ट खात्याची सेवा मात्र न घाबरता चालू होती. आमच्या सर्व योजना लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मधुमिता दास पुढे म्हणाल्या की, पोस्टात रक्कम गुंतविणे हे अत्यंत सुरक्षित आहे. ज्येष्ठ नागरिकांना आम्ही घरपोच सेवा देत असतो. आता केवळ आधार कार्डावरून खाते काढता येते. दीर्घ मुदतीचा विमा हाही फायद्याचा आहे. त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या आयुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

यावेळी बोलताना सुरेश साखवळकर म्हणाले की, गेली साडेतीन वर्षे स्टेशन परिसरातील नागरिकांना पोस्टाअभावी विलक्षण गैरसोय सहन करावी लागली. तथापि नगरसेवक निखिल भगत यांच्या विशेष प्रयत्नांमधून व स्वखर्चातून या नव्याने सुरू होत असलेल्या पोस्टाचा कार्यारंभ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नवी वास्तू सुरक्षित व प्रशस्त असल्याबद्दल खात्याला धन्यवाद द्यावे लागतील.

ज्येष्ठांच्या तसेच पोस्टाशी संबंधित असणार्‍या नागरिकांच्या रोजच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघाला असून या सामाजिक प्रश्नाची जाण नगरसेवक निखिल भगत यांनी राखली असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

नगरसेवक निखिल भगत, विश्वास देशपांडे यांनीही विचार व्यक्त केले. जिल्हा ग्रामीण डाकघर अधीक्षक प्रमोद भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक, गणेश वाडूरकर यांनी आभार प्रदर्शन केले तर संगीता दाते यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.