Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांनी इतरांपेक्षा स्वतःशीच स्पर्धा करावी – शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी

एमपीसी न्यूज- स्वतःला ओळखून करिअरचे क्षेत्र निवडा. इतरांशी स्पर्धा न करता ती स्वतःशीच करा. आपले व्यक्तिमत्व मूल्यवर्धित करा. यशाचा प्रवास न संपणारा असल्याने येणाऱ्या आव्हानांना पेलण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनात्मक पातळीवर भक्कम पाया रचा, असा सल्ला राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी (IAS) यांनी आज येथे दिला.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरखभाऊ काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह , डॉ. दीपक शहा, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सोलंकी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जगद्विख्यात बास्केटबॉल पटू मायकेल जॉर्डन आणि स्वामी विवेकानंद यांच्या वैचारिकतेची उदाहरणे देताना सोलंकी म्हणाले की, चरित्र्याशिवाय यश नाही. अंगभूत व मूलभूत गुण महत्त्वाचे आहेत पण स्पर्धा परीक्षा देण्यापूर्वी त्याचे तंत्र आणि सराव सुरवातीपासूनच केला पाहिजे. 15 16 तास अभ्यास केला पाहिजे. इंग्रजी भाषेवर आणि माहिती व तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. स्वअभ्यासातूनच यशाचा मार्ग जातो मात्र मार्गदर्शन वर्गामुळे अभ्यासाची दिशा मिळते. सहस्पर्धक मित्रांशी चर्चा करून विषयाचे आकलन अधिक चांगले होते

माहिती आणि ज्ञानाचा आवाका मोठा करायचा असेल तर प्रामाणिक प्रयत्नाला पर्याय नाही. आपल्याला नेमके काय करायचे आणि त्यासाठी आपल्यात ती क्षमता आहे की नाही याचे आत्मचिंतन प्रथम केले पाहिजे. ज्ञान आणि माहितीचा उपयोग आपण समाजहितासाठी कसा करतो यावर यशाची मदार अवलंबून आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या माध्यमातून जगात जे चांगले आहे, अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे प्रयत्न शासन करत आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेतही तो मागे पडणार नाही असे सोलंकी म्हणाले

संदीप काकडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.