Talegaon Dabhade : नगरपरिषदेचा करवाढ नसलेला 211 कोटी 40 लाख रूपये तरतुदीचा अर्थसंकल्प मंजूर

एमपीसी न्यूज – आगामी आर्थिक वर्षासाठी कोणतीही दरवाढ, करवाढ नसलेला 211 कोटी 40 लाख रूपये खर्चाच्या तरतुदीचा अर्थसंकल्प गुरूवारी (ता.21) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपुर्वीचा हा अर्थसंकल्प मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सभागृहास सादर केला. अखेरची शिल्लक 26 लाख 20 हजार असून करवाढ, दरवाढ करण्याची कोणतीही जोखीम घेतल्याचे त्यात दिसून येत नाही.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील, सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा हा अर्थसंकल्प 211 कोटी 40 लाख 82 हजार रूपये खर्चाचा आहे. त्यावर चर्चा करण्यापूर्वी विरोधी गटाचे नेते किशोर भेगडे यांनी सुधारित कर आणि दरवाढीबाबत प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या बाबींना याआगोदरच सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवून ठरावास मंजुरी घेतलेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

  • विरोधी गटाचे नेते किशोर भेगडे म्हणाले, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी सभागृहास त्याची माहिती देणे, त्यावर चर्चा करून ठराव मंजुर करणे आवश्यक होते, असे न केल्याने त्याचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या हितावर होतात. स्थायी समितीच्या सभेत देखील हे विषय समाविष्ट करण्यात आले नाहीत.

नगरपरिषद अधिनियमाच्या कायद्यानुसार ते प्रथम ठरावाव्दारे मंजुर करणे अपेक्षित होते. विकासकामांच्या दरवाढीबाबत विशिष्ट लोकांना व बिल्डर्सना डोळ्यासमोर ठेवून ते प्रशासनाने परस्पर करून थेट बजेटमध्ये मांडले आहेत. त्यामुळे सभागृहाची दिशाभूल, फसवणुक केली जात आहे. यावर मुख्याधिका-यांनी वारंवार स्पष्टीकरण देवूनही किशोर भेगडे यांचे समाधान झाले नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी देखील भेगडे यांनी निदर्शनास आणून दिलेल्या तांत्रिक चुकीची पाठराखण करत मुख्याधिका-यांना अडचणीत आणले.

  • यंदाचा अर्थसंकल्प मंजूर होईल किंवा कसे आणि झालाच तर त्याची वैधता कितपत राहिल, या चिंतेने सभागृहात गंभीर वातावरण बनले. एक तासानंतर अखेर सभागृह नेते सुशील सैंदाणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भेगडे यांच्याशी सभागृहात कानगोष्टी करून अर्थसंकल्पावरील चर्चेचा मार्ग खुला केला. दरम्यान, किशोर भेगडे यांनी उपसूचना नोंदवून सभागृह सोडले. ही उपसूचना अर्थसंकल्पाच्या मंजुरीस अडचणीची ठरू शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

किशोर भेगडे यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावरील चर्चेत नगरसेवक सुनील शेळके, गणेश खांडगे, सुशील सैंदाणे, सुलोचना आवारे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, अमोल शेटे यांनी सुरवातीच्या तासातील चर्चेत भाग घेतला. त्यास मुख्याधिका-यांना स्पष्टीकरण देण्याची मोठी कसरत करावी लागली. नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांनी इतर विषय बाजूला ठेवून बजेटवरील चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केविलवाणा ठरला. अखेर एक तासानंतर बजेटचे वाचन आणि चर्चेस सुरवात झाली. दुपारी अडीचच्या दरम्यान अखेर काही किरकोळ बदल करून अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.