Talegaon Dabhade : हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या महाराष्ट्राचे मराठीपण जपायला हवे – रामदास काकडे 

  • एमपीसी न्यूज – संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला महाराष्ट्र मिळाला आहे. महाराष्ट्राचे मराठीपण त्याच्या संस्कृती, उद्योग, शिक्षण यांच्या जोरावर उभे आहे. ते मराठीपण आपण प्रत्येकाने जपायला हवे, असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या 63व्या वर्धापनदिनानिमित्त काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त विलास काळोखे, संजय साने, निरूपा कानिटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य डाॅ जी एस शिंदे, उपप्राचार्य अशोक जाधव आदी उपस्थित होते.

Khed Court News : तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन; पोलीस पाटलाला 5 वर्ष सश्रम कारावास

 

रामदास काकडे म्हणाले, महाराष्ट्राने भारताला ‘देश’ म्हणून घडविण्यात मोठी भूमिका बजावली असून अनेक क्षेत्रात आज महाराष्ट्राची प्रगती ही विस्मयचकित करणारी आहे. टिळक आगरकरांपासून ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, नितीन गडकरी अशा द्रष्ट्या नेतृत्वांनी मराठीपण जपत महाराष्ट्राला देशात नावलौकिक मिळवून दिला.

संत साहित्यांची प्रेरणा आणि छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या आदर्शाच्या भक्कम पायावर आजचा महाराष्ट्र उभा आहे. उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पायाभूत सोयीसुविधा या अनुषंगाने अर्थार्जन या दृष्टिकोनातून महाराष्ट्र देशात वेगळे राज्य आहे. महाराष्ट्राचे पुरोगामीत्व शाहू, फुले, आंबेडकरी विचारांनी अधिकच तीव्र केले. अशी उज्ज्वल आणि वैभवशाली विचार, शिक्षण, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक परंपरेचे आपण वारस आहोत. देशातील एकूण सार्वजनिक उत्पन्नापैकी (जीडीपी) 15 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. आयटी, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, कृषीपुरक उद्योग व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राची भरभराट मोठी आहे, असे काकडे म्हणाले.

आपल्याकडे शिक्षणाचा असलेला अतिउच्च दर्जा हा व त्यातून घडलेल्या अनेक पिढ्यांनी चारित्र्यसंपन्न महाराष्ट्र निर्माण केला. यापुढेही करत राहतील असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. गुन्हेगारी, बलात्कार, व्यसनाधीनता अशाकाही महत्वाच्या आव्हांनांची चर्चा करत विद्यार्थ्यांनी या चुकीच्या गोष्टींना टाळून संपन्न महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान देण्याची अपेक्षा काकडे यांनी व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य मोलाचे असून त्यांनी उभारलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून मावळातील तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना संस्थेची उत्तम प्रगती करून सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. संस्था भविष्यात विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे, असेही डाॅ मलघे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सुरेश थरकुडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.