Talegaon : कलापिनी तर्फे संस्थापक कै. डॉ. शं. वा. परांजपे यांच्या स्मृतीला नाट्य वाचनाद्वारे वंदन

एमपीसी न्यूज – तळेगावातल्या कलापिनी सांस्कृतिक केंद्रात (Talegaon) नुकत्याच कलापिनी चे संस्थापक कै. डॉ. शं. वा. परांजपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘आधी केलेची पाहिजे’ या उपक्रमात नाट्यवाचनाद्वारे कै.परांजपे यांना वंदन करण्यात आले.

यावर्षी संस्थापकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी काम केलेल्या नाटकांतल्या निवडक नाट्यप्रवेशांचं वाचन कलापिनीच्या कलाकारांनी उत्तमरीत्या सादर केलं. यावेळी श्री गणेश वाचनालयाचे प्रशांत दिवेकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. किरण परळीकर, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्ष अशोक बकरे आदी उपस्थित होते.

या नाट्यवाचनच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कलापिनीच्या रंगमंचाच्या भव्य शटरचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं. संस्थेचे खजिनदार श्रीशैल गद्रे यांनी भावी नाट्यसंकुलाची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाची सुरुवात गायिका संपदा थिटे यांच्या ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या गीतांनं झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि स्वागत कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी केलं.

त्यानंतर आचार्य अत्रेंच्या ‘मी उभा आहे’ या नाटकातल्या प्रवेशाचं प्रतीक मेहता, विजय कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी, हृतिक पाटील यांनी, गो. नी. दांडेकरांच्या ‘शितू’ चं माधुरी ढमाले-कुलकर्णी, संदीप मनवरे यांनी, विश्राम बेडेकरांच्या ‘वाजे पाउल आपुले’चं रविन्द्र पांढरे, अनघा बुरसे यांनी, मधुसूदन कालेलकरांच्या ‘दिवा जळू दे सारी रात’ मधल्या प्रवेशाचं मीनल कुलकर्णी यांनी तर पु. ल. देशपांडेंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातल्या प्रवेशाचं राजेंद्र पाटणकर, विराज सवाई यांनी वाचन करून उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि ताकदीची अशी ही नाटकं नवीन पिढीला कळावीत, त्यांनी ती यानिमित्ताने अभ्यासावी आणि भविष्यात अशीच दर्जेदार नाटकं सादर करावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशांत दिवेकर आणि पं. किरण परळीकर यांनी कै. डॉ. शं. वा. परांजपे च्या आठवणींना उजाळा दिला आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे सूरू असलेल्या वाटचालीसाठी मार्गदर्शनही केलं.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विराज सवाई यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी (Talegaon) श्रीपाद बुरसे, दीप्ती आठवले, दीपक जयवंत, अनिरुद्ध जोशी आदींनी सहकार्य केले. उपाध्यक्ष अशोक बकरे यांनी आभार मानले. श्लोकगायनानं कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.