Talegaon News : इंद्रायणी महाविद्यालयातील प्रा. बाळासाहेब रसाळ यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने ऑनलाईन समारंभाचे आयोजन

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागात कार्यरत असणारे प्रा. बाळासाहेब काशिनाथ रसाळ हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. 

प्रा. रसाळ हे कला, वाणिज्य महाविद्यालय दौंड या ठिकाणी 1988 मध्ये रुजू झाले होते. तेथील अकरा वर्षाच्या सेवेनंतर 1999 मध्ये इंद्रायणी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागांमध्ये वाणिज्य विभागाचे प्राध्यापक म्हणून त्यांचे समावेशन झाले. वाणिज्य विभागाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. उत्तम व आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी हातभार लावला. वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली.

महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग राहिला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून देखील त्यांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शिबिरे घेतली व त्या माध्यमातून चांगले उपक्रम राबविले. इंद्रायणी विद्या मंदिर व इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक रसाळ यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ऑनलाईन समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, प्राध्यापक रसाळ यांचा मनमिळावू स्वभाव व त्यांचे विद्यार्थी प्रती असलेली प्रेम या बाबींमुळे ते सतत आमच्या लक्षात राहतील. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी प्रस्ताविक केले. प्राध्यापक रसाळ सरांच्या जीवनकार्यावर आपल्या प्रास्ताविकामधून प्रकाश टाकला. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असलेल्या प्रा. रसाळ यांचा तळेगाववर विशेष स्नेह असल्याचे सांगितले.

या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. के. व्ही .अडसूळ, वाणिज्य विभागाचे प्रा. डी .पी. काकडे, प्रा.उत्तम खाडप, प्रा. ए .एम. जगताप यांनी प्राध्यापक रसाळ यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या शुभहस्ते प्राध्यापक रसाळ यांना शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांची कन्या डॉक्टर पूजा रसाळ यादेखील उपस्थित होत्या.

सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, दौंड महाविद्यालयाच्या तुलनेत इंद्रायणी महाविद्यालयात होणारे शैक्षणिक उपक्रम व येथील गुणवत्ता उत्तम आहे. महाविद्यालयाला लाभलेला सुंदर परिसर, भव्य वास्तू आणि संस्थाचालकांचे सहकार्य या सगळ्या गोष्टींमुळे इंद्रायणीमध्ये सेवा करण्यामध्ये वेगळाच आनंद वाटत राहिला.

आभार प्रा. विद्या भेगडे यांनी मानले. याप्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने मावळभूषण माजी आमदार शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे साहेब तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, डॉ.दीपक शहा, संस्थेचे खजिनदार शैलेश शहा आदी मान्यवरांनी प्राध्यापक रसाळ यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.