Talegaon News : जैन समाजाचे सामाजिक योगदान महत्त्वाचे – किशोर आवारे

एमपीसी न्यूज – महावीर जयंती निमित्त तळेगाव शहरातील जैन बांधव विविध सामाजिक उपक्रम साजरे करत असतात. जनसेवा विकास समिती संचालित जनसेवा थाळीच्या उपक्रमाला जीरावला पार्श्वनाथ ट्रस्ट तळेगाव येथील सदस्यांनी अन्न दान करून अनोख्या पद्धतीने महावीर जयंती साजरी केली.

भगवान महावीर हे वीर, अतिवीर, सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. परोपकार हेच महावीरांचे पुण्य कार्य होते असे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी यावेळी नमूद केले.

किशोर आवारे यांचे जनसेवा थाळीचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. गरीब नागरिकांसाठी अन्न दान करताना जैन बांधवाना आनंद होत असल्याचे जीरावला पार्श्वनाथ ट्रस्ट तळेगावचे अध्यक्ष अनिल मेहता यांनी सांगितले.

जनसेवा विकास समितीच्या जनसेवा थाळीला तळेगाव स्टेशन परिसरात उदंड प्रतिसाद मिळत असल्याने जनसेवा थाळी नियमित सुरू ठेवणार असल्याचे किशोर आवारे यांनी नमूद केले.

महावीर जयंती निमित्त भाजी, चपाती, डाळ, भात, बुंदीचे लाडू,व शेव असा मेनू थाळीत देण्यात आला होता. या प्रसंगी नगरसेवक गणेश खांडगे, निखिल भगत, मिलिंद अच्युत, अनिल पवार, जीरावला ट्रस्ट अध्यक्ष अनिल मेहता, भवरलाल ओसवाल, दिनेश ओसवाल, प्रकाश ओसवाल, अशोक संघवी, रमेश ओसवाल, चेतन पटवा व जैन युवक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.