Pune News : रुग्णाच्या जीवाशी खेळ, दळवी हॉस्पिटलमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना नाहीत !

एमपीसी न्यूज – विरार येथील कोरोना बाधित रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असताना शिवाजीनगर परिसरातील महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये कुठलीच आग प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सात महिन्यापूर्वी अग्निशमन दलाने रुग्णालयाचे फायर ऑडिट करून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पूर्तता करावी, असे आदेश दिले असताना अद्याप कुठलीच कार्यवाही केलेली नाही.

दरम्यान या रुग्णालयात दीडशेहून अधिक ऑक्सिजन, व्हेंटीलेटर खाटांची क्षमता असून तेवढे रुग्ण उपचार घेत आहेत. या व्यतिरिक्त बाधित रुग्ण देखील असताना रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे रुग्णांचा जीव अधांतरीच असल्याचे दिसून येत असून महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी आणि तात्काळ आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पूर्तता करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांनी केली आहे.

भंडारा येथील रुग्णालयाला आग लागल्याची घटना झाल्यानंतर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे परीक्षण करून घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. पुणे महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी 11 जानेवारी रोजी तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वीच अग्निशमन विभागाने दळवी हॉस्पिटलचे फायर ऑडीट केले असून, पुन्हा ऑडीट करून आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या; पंरतु अद्यापही कुठल्याच उपाययोजनांची पूर्तता करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

अग्निशमन विभागाने फायर ऑडीटमध्ये सदरहून इमारतीचे बांधकाम आरसीसीमध्ये असून येथे आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. चार मजल्यांच्या इमारतीत प्रत्येकी चार नग एबीसी टाईप फायर एक्स्टिंगविशर्स 6 कि.ग्रॅ. क्षमतेने व अग्निशमन यंत्रणेचे वेट रायझर, होज रिल होज, कोर्टयार्ड हायड्रन्ट सिस्टिम, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म बसवण्याचे सूचित केले आहे. तसेच ऑक्सिजन गॅस बँक इमारतीच्या बाहेर करण्याच यावी असे आदेश अग्निशमन दलाचे स्टेशन ड्युटी ऑफिसर प्रमोद सोनवणे यांनी ऑडीटमध्ये दिले आहेत. मात्र, अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. तर दुर्घटना घडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निकम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.