Talegaon News: गाडी न थांबवल्याने महिलेचा विनयभंग करत एकास मारहाण

एमपीसी न्यूज – हे माझे शेत आहे, तुम्हाला हात दाखवला तर कळत नाही का गाडी थांबवायला, असे म्हणत सहा जणांनी मिळून एका महिलेसोबत गैरवर्तन करत महिलेसोबत असलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री सव्वानऊ वाजता कुसगाव येथील वाघजाई वस्ती येथे घडली.

बाबासाहेब दामू गायकवाड, आतिष बाबासाहेब गायकवाड, सतीश ओव्हाळ व दोन ते तीन इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने रविवारी (दि. 2) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र कारमधून कुसगाव येथील वाघजाई वस्ती येथून शुक्रवारी रात्री जात होते. सव्वानऊ वाजता आरोपी बाबासाहेब गायकवाड याने फिर्यादी यांच्या कारला हात करून थांबवले. ‘हे माझे शेत आहे. तुम्हाला हात दाखवला तर कळत नाही का गाडी थांबवायला’ असे म्हणून फिर्यादी यांच्या मित्राला गाडीतून खाली उतरवले. मित्राला मारहाण करून गाडीवर ओरखडे मारले. बाबासाहेब याने त्याच्या मुलाला बोलावले. बाबासाहेब याच्या मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या मुलाला पुन्हा मारहाण केली. बाबासाहेब याने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. पोलीस नाईक जुंदरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.