Talegaon : दिवाळीनिमित्त उभारलेल्या किल्ल्याच्या हलत्या देखाव्यातून उलगडला पावनखिंडीचा इतिहास

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त लहान मुले किल्ले बनवून त्यावर (Talegaon) मावळे ठेवतात. दिवाळीच्या सुट्टीत किल्ल्यांची निगा राखतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील एखादा प्रसंग सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची भन्नाट किमया तळेगाव दाभाडे मधील राव कॉलनी येथील विशाल रेसिडेन्सीतील नागरिकांनी साधली आहे. पन्हाळगड ते विशाळगड आणि पावनखिंडीची लढाई हा प्रसंग हलत्या देखाव्यातून सोसायटी मधील नागरिकांनी साकारला आहे.
सोसायटी मधील रहिवासी मयूर शिंदे आणि रोहित थोपटे यांनी याबाबत माहिती दिली. दिवाळीनिमित्त अनेकजण घर, सोसायटीच्या अंगणात किल्ले बनवतात. दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनीला किल्ला बनवणे हा एकमेव छंद जडलेला असतो. मात्र दगडावर दगड उभारून त्याला चिखल मातीने सारवून घेत किल्ला बनवण्यापेक्षा किल्ल्यांच्या अनुषंगाने घडलेला इतिहास मुलांसमोर येण्यासाठी राव कॉलनी येथील विशाल रेसिडेन्सी मधील नागरिकांनी पन्हाळगड ते विशाळगड आणि पावनखिंडीतील लढाई हा प्रसंग उभारण्याचे ठरवले.
सुमारे साडेचार फूट उंचीच्या या हलत्या देखाव्यात पन्हाळगड, विशाळगड, घोडखिंड (पावनखिंड), मावळे उभारले. मावळ्यांच्या मूर्ती मातीच्या बनवण्यात आल्या. त्यांना कपडे देखील घरच्या घरी शिवून घेत संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक बनवला.
जे देखावे गणेशोत्सव मंडळे उभारतात, तशा पद्धतीचा देखावा दिवाळीत तोही सोसायटीच्या आवारात उभारण्यात आला. लढणारे मावळे, तोफेचा आवाज, जात्यावर धान्य भरडणारी महिला, खेळणारी लहान मुले, कुस्तीचे मैदान, गाव, पन्हाळगड, घोडखिंड, घोडखिंडीत झालेली लढाई, धारातीर्थी पडलेले मावळे आणि शेवटी महाराजांची पालखी विशाळगडावर पोहोचताच उडालेला तोफेचा आवाज इतिहासाचे सुवर्णपान उलगडून ठेवतो.

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. सिद्धीचा वेढा सुटण्याचे नाव घेत नव्हता. सिद्धीला बुद्धीच्या जोरावर मुसंडी देऊन पन्हाळगडावरून विशाळगडावर जाण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. त्याच वेळी त्यांनी शिवा काशीद नावाच्या एका शूर मावळ्याला तहाची बोलणी करण्याच्या निमित्ताने सिद्धीकडे पाठवले. शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यास तयार झाल्याचे ऐकताच सिद्धीचा वेढा काहीसा गाफील राहिला.
हीच संधी साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे प्रयाण केले. ही बातमी सिद्धीला समजताच त्याने भलेमोठे सैन्य महाराजांच्या मागावर पाठवून दिले. दरम्यान, बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या निवडक मावळ्यांसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याला थोपवून  धरले. महाराज गडावर पोहोचताच तोफेचा आवाज करावा, म्हणजे मावळ्यांना समजेल की, राजे गडावर सुखरूप पोहोचले.
महाराज गडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरले. या लढाईत बाजीप्रभूंसह अनेक मावळ्यांना वीरमरण आले. मावळ्यांच्या रक्ताने पावन झाल्याने या घोडखिंडीला पावनखिंड असेही म्हटले जाते. हाच इतिहास विशाल रेसिडेन्सीमधील सुमारे 40 ते 50 नागरिकांनी सर्वांना (Talegaon)  दाखवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.