Tathwade News : टाटा समुहातर्फे मेट्रोच्या कामगारांसाठी ताथवडे येथे सुसज्ज वसाहतीची उभारणी

एमपीसी न्यूज – मेट्रो रेल्वे सारख्या प्रकल्पांचे काम हे फक्त एखाद्या शहराच्या नागरी विकासापुरते मर्यादित नसून सक्षम आणि मजबूत राष्ट्रउभारणीमध्ये योगदान देणारे देखील असते. मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीमुळे समाजातील सर्व घटकांना सुलभ, वेगवान आणि स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होतो. अशा या मेट्रोच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या श्रमिकांच्या निवाऱ्यासाठी ताथवडे येथे टाटा समुहातर्फे एक सुसज्ज निवासी वसाहत स्थापन करण्यात आली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3 चे काम ‘पीएमआरडीए’ तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.

त्या अंतर्गत पुणे मेट्रो लाईन 3 च्या उभारणीसाठी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड (टीपीएल) ची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे मेट्रो लाईन 3 च्या कामामध्ये सक्रिय सहयोग देणाऱ्या कामगारांसाठी टीपीएल कंपनीच्या वतीने ताथवडे कास्टींग यार्ड येथे कामगार वसाहत स्थापन करण्यात आली आहे. ही वसाहत म्हणजे पत्र्याच्या खोल्या किंवा तात्पुरती उभारलेली शेड या स्वरूपात नसून टाटा समूहाच्या सामाजिक बांधिलकी आणि तत्त्वांना अनुसरून एक नेटकी आणि सुसज्ज वसाहत येथे निर्माण करण्यात आलेली आहे.

पक्क्या बांधकामाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या या कामगार वसाहतीमध्ये एकूण 700 कामगारांची निवाऱ्याची, विश्रांतीची आणि भोजनाची उत्तमपणे सोय करून देण्यात आलेली आहे. प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांच्या भोजनासाठी येथे सुसज्ज स्वयंपाकघर आणि भोजनालय बांधण्यात आले आहे तसेच कामगारांचे आरोग्य जपण्यासाठी परिसर स्वच्छता, शौचालये, सांडपाणी नियोजन यांकडेही कटाक्षाने लक्ष पुरविले जात आहे. कामगारांच्या वैद्यकीय गरजांकडे तातडीने लक्ष पुरवण्यासाठी दोन एमडी डॉक्टरांची 24 तास नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे डॉक्टर याच वसाहतीत कामगारांसोबत राहून दोन शिफ्टमध्ये कामगारांच्या आरोग्याची देखभाल करत आहेत.

पुणे मेट्रो लाईन 3 बाबत माहिती 

पुणे मेट्रो लाईन 3 हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा 23 किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या टीएआयआरएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे.

हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे 35 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.