Tathawade : पालिका आणि जागा मालकाच्या वादात रस्त्याचे काम रखडले

नागरिकांचा बांधकाम व्यावसायिकासह पालिकेवर रोष

एमपीसी न्यूज – ताथवडे येथील (Tathawade) कोहिनूर सफायर वन या सोसायटी समोरील रस्त्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जागा मालक यांच्यातील न्यायालयीन वादामुळे रखडला आहे. त्याचा त्रास या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत असून रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. दरम्यान, सोसायटी मधील काही नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी करत रोष व्यक्त केला आहे.

ताथवडे येथील कोहिनूर सफायर वन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सुमारे एक हजार पेक्षा अधिक नागरिक वास्तव्य करतात. कोरोना काळात सुरु झालेल्या या प्रकल्पात नागरिकांनी घरे घेतली आहेत. डेव्हलपर्सच्या माहितीनुसार, या इमारतीमधील सदनिकांचे नियोजित वेळेपूर्वी हस्तांतरण करण्यात आले. सोसायटी समोरून जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.

सोसायटीकडे जाणारा रस्ता तयार करण्याबाबत नागरिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रार केली. मात्र रस्त्यासाठी बाधित होणा-या एकूण क्षेत्रापैकी 80 टक्के पेक्षा अधिक क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात नसेल तर रस्ता विकसित करण्यासाठी निविदा काढता येणार नाही. स्थानिक जागा मालकाशी चर्चा सुरु असून जागा पालिकेकडे हस्तांतरित झाल्यास रस्त्याचे काम करणे शक्य होईल, असे महापालिकेने लेखी उत्तर नागरिकांना दिले आहे.

सोसायटीला पाणीपुरवठा देखील होत नसून नागरिकांना पाण्यासाठी हजारो-लाखो रुपये मोजावे लागत असल्याचीही तक्रार पालिकेकडे करण्यात आली. त्यावर पालिकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, महापालिकेचा पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत सदर गृहप्रकल्पाला व रहिवाशांना आवश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याची सोय स्वखर्चाने करेन.

तसेच आंद्रा धरणातून व भामा आसखेड धरणातून पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता होऊन ते वितरण व्यवस्थेत येईपर्यंत नवीन नळ जोड मागणार नाही. असे बांधकाम व्यावसायिकाकडून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी घेतले असल्याचे पालिकेने नागरिकांना लेखी सांगितले आहे.

स्थानिक रहिवासी निलेश शितोळे म्हणाले, “रस्ता, पाणी, ड्रेनेज सिस्टीम अशा मुलभूत सुविधा नसताना पालिकेने गृहप्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला कसा दिला. सफायर वन या सोसायटीच्या बाजूला आणखी काही बांधकाम साईट सुरु असून जर या सोसायट्यांकडे जाणारा रस्ता पूर्ण नसेल तर तिथे बांधकाम करण्यास पालिकेने परवानगी कशी दिली. मागील चार वर्षांपासून हा रस्ता तयार होईल, असे आश्वासन दिले जात आहे. जर मुलभूत सुविधा नसतील तर आम्ही मालमत्ता कर का भरायचा, असा सवाल देखील शितोळे यांनी उपस्थित केला.

Khed : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

याबाबत बांधकाम व्यावसायिकाकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून (Tathawade) प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे येतात. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने, स्वीगी झोमॅटो, कॅब चालक या भागात येण्यास नकार देतात. खड्डेमय रस्त्यावरून जाताना एका ज्येष्ठ नागरिकाचा अपघात झाला. एका महिलेला देखील दुखापत झाली असल्याचे शितोळे म्हणाले.

कोहिनूर सफायर वनचे कस्टमर रिलेशन मॅनेजर सचिन देशमुख म्हणाले, “आम्ही नागरिकांना जो रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले होते, तो रस्ता स्वखर्चाने बनवून दिला आहे. ज्या ठिकाणी स्थानिक शेतकरी आणि पालिका यांचा न्यायालयीन वाद सुरु आहे, तिथला सुमारे 25 मीटर अंतराचा रस्ता बाकी आहे. तो आमच्या अखत्यारीत येत नाही. पालिकेकडून नळ कनेक्शन घेऊन दिले आहेत. मात्र पालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. यामध्ये आम्ही काही करू शकत नाही.

गणेशोत्सवात डेव्हलपर्स यांनी सफायर वन या सोसायटी मधील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. मंडळाला 25 हजार रुपयांची वर्गणी दिली. त्यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी कोणीही काहीही तक्रार केली नाही. पाठीमागे कोणीतरी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही नागरिकांना जे आश्वासन दिले ते आम्ही पूर्ण केले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.