Tathwade: पवना नदीत ताथवडेमध्ये मृतावस्थेत आढळले मासे आणि कासव

एमपीसी न्यूज – पवना नदीत ताथवडे येथे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. तसेच नदीतील कासवाचा देखील मृत्यू झाला आहे. रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे मासे मेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पवना नदीतील मासे मरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नदीमध्ये विनाप्रक्रिया थेट पध्दतीने मैलामिश्रित सांडपाणी सोडले जाते. रसायन मिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे माशांचा मृत्यू होत आहे. ताथवडे, स्मशानभूमी येथे पवना नदीत बुधवारी (दि. 4) रात्री मासे मेले आहेत. मासांचा खच साचला आहे. त्याचबरोबर नदीतील कासवाचा देखील मृत्यू झाला आहे. रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे मासे, कासवाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी आज (गुरुवारी) सकाळी पाहणी केली आहे. ”छोटे मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. पाण्याचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेत तपासणीला दिले आहेत. प्रदुषण नियंत्रण मंडळाने देखील पाण्याचे नमुने घेतले आहेत. तपासणीनंतरच मासे कशामुळे मेले याचे कारण समजेल असे”, संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने चालले आहे की शहराच्या पर्यावरणाची वाट लावण्याच्या दिशेने चालले आहे. सहा महिन्यांपूर्वी देखील पवना नदीत केमिकल सोडल्यामुळे हजारो मासे मृत पावले आहेत. त्यावेळी टीएसएफ आणि डब्ल्यूएफएनने महापालिकेच्या पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला धारेवर धरले होते. दंडात्मक कारवाई केली होती. असे असताना पुन्हा बुधवारी रात्री माशांचा मृत्यू झाला आहे. विषारी रसायन नदीत मिसळल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. तसेच नदीतील कासवाने सुद्धा शेवटचा श्वास घेतला आहे.

प्रत्येकवेळी पाण्यात केमिकल आले की महापालिकेचा पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ फक्त नमुने घेऊन जातात. दंड होतात. पण, पुढे ‘जैसे थे’च परिस्थिती राहते. यामुळे लवकरच पवना नदीला मृत घोषित करावी लागेल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी मोठा लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.