Chakan : बेपत्ता चिमुरड्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत

नाणेकरवाडीतील घटना

एमपीसी न्यूज – नाणेकरवाडी (चाकण, ता. खेड) येथून शनिवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्या मुलाचा मृतदेह जवळच असलेल्या एका बंगल्याच्या जिन्याखालील पाण्याच्या टाकीत रविवारी (दि.२३) सकाळी मिळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या टाकीच्या जवळ मिळून आलेल्या लहान मुलाच्या चपलेवरून शोध घेतला असता ही धक्कादायक घटना समोर आली.

चिकू मिथून राठोड (वय २ वर्षे, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड), असे या घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांचा चिमुरडा चिकू शनिवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घरासमोरील अंगणातून अचानक गायब झाला होता. या प्रकरणी मुलाचे वडील मिथून शेषराव राठोड ( वय ३०) यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलिसात शनिवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली होती.

चाकण पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने रविवारी सकाळपासून संबंधित घराच्या लगतच्या भागात शोध सुरु केला होता. अपहरण झाल्याच्या संशयातून सोशल माध्यमांवर संबंधित मुलाची छायाचित्रे या भागात पाठविली  होती. त्यानंतर घराजवळील जिन्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीत शोध घेतला असता संबंधित चिमुरडा चिकू याचा मृतदेह मिळून आला. चाकण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून रविवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.  चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.