BNR-HDR-TOP-Mobile

chakan : पोतलेमळा येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात पारडू ठार

बिबट्या असल्याचा स्थानिकांचा यांचा अंदाज, वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची केली मागणी 

PST-BNR-FTR-ALL

( घटनास्थळी आढळून आलेले ठसे )

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील बहुळ – शेलपिंपळगाव रस्त्यावरील पोतले मळा शिवारात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पारडू ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. 15) पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. या घटनेने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून संबंधित हल्लेखोर वन्य प्राणी बिबट्याच असल्याचा संशय स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.  मच्छिंद्र कान्हू पोतले (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी याबाबत वन विभागाकडे तक्रार केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बहुळ- शेलपिंपळगाव रस्त्यावरील शिवारात मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास म्हशींचा आणि पाळीव कुत्र्यांचा मोठा आवाज एकू आल्याने मच्छिंद्र पोतले यांनी गोठ्याकडे जाऊन पहिले असता वन्य प्राणी लगतच्या उसाच्या शेतात पळताना त्यांना दिसला. म्हशीचे पारडू संबंधित प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत पोतले आणि परीसारातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केली असून ‘तो’ वन्य प्राणी बिबट्या असल्याचे सांगितले आहे.

वनविभागाच्या वतीने घटनास्थळी पाहणी केली असता ठसे मिळून आले आहेत. हे ठसे बिबट्या किंवा तरसाचे असावेत, असा अंदाज वनविभागाने लावला आहे. चाकण वनविभागाचे वनपाल प्रदीप कासारे यांनी सांगितले की, पोतले मळा शिवारात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पारडू ठार झाले आहे. काही ठसे त्या ठिकाणाहून मिळाले असून ते बिबट्या किंवा तरसाचे असावेत. संबंधित भागातील शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मागील महिन्यात (14 डिसेंबर 2018 ) ठाकूर पिंपरी (ता.खेड) येथे लपून बसलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. खेडच्या पूर्व भागातही मागील काही महिन्यापासून बिबट्याचा रात्रीच्या वेळी संचार होत असल्याने शेतवस्तीवरील शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.