Pune : राष्ट्रउभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे

डॉ. श्रीपाल सबनीस; 'अभियंता मित्र'तर्फे गुणवंत अभियंते व पाल्यांचा सत्कार

एमपीसी  न्यूज – “राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. काही लोक भ्रष्टाचारी असू शकतात. मात्र, त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वानी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

विकासकर्मी अभियंता मित्र, सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभाग आणि पुणे महानगरपालिका अभियंता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे व कमलाकांत वडेलकर यांच्या वाढदिवसानिमित्त व अभियंता मित्रच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजिला होता. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते, संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ, मुख्य अभियंता प्रवीण किडे, ठाणे शहर अभियंता अनिल पाटील, लक्ष्मण व्हटकर, माजी सैनिकी अधिकारी विष्णुपंत पाटणकर, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलाकांत वडेलकर आदी उपस्थित होते. प्रसंगी विष्णुपंत पाटणकर लिखित ‘भारतीय युद्धकथा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “देशात राष्ट्रभक्ती अजून जिवंत आहे. अभियंत्यांच्या मनामध्ये ती अजूनही पाहायला मिळते. अभियंता मित्र मासिकामुळे अभियंत्यांमधील सर्जनशील लेखक, कवी घडविण्याचे काम झाले आहे. अभियंत्यांच्या कथा व व्यथा मांडण्यासाठी आणि त्यांच्या कमला प्रोत्साहन देण्यासाठी वडेलकर अभियंता मित्रच्या माध्यमातून करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.”

किरण गित्ते म्हणाले, “प्रशासकीय अधिकारी आणि अभियंता यांचा खूप जवळचा संबंध आहे. अभियंत्यांना तंत्र माहिती असते, तर अधिकाऱ्यांना लोकांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य माहित असते. तांत्रिक प्रश्न सामान्य भाषेत रूपांतरित करून सांगणे आवश्यक असते. अभियंत्यांनी पर्यावरणपूरक काम करण्यासह सामाजिक आर्थिक विकासाचे भान राखायला हवे. तसेच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढवायला हवी.”

पंडित गाडगीळ, प्रवीण किडे, कमलाकांत वडेलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वसंत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कदम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.