Pune : महापालिका अधिकाऱ्याने जो विकास आराखडा केला तोच मान्य केला जाईल – संजय काकडे 

एमपीसी न्यूज : येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांच्या मुद्द्यावर भाजपचे राजसभेचे खासदार संजय काकडे हे पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार योगेश टिळेकर यांची चांगलीच कोंडी करणार आहेत असच दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचा इशारा देत काकडेंनी बापट आणि टिळेकर यांना घरचा आहेर दिला आहे. 

खासदार संजय काकडे यांनी येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे मागितली असून, या विकास आराखड्यात कोणतीही चुकीची कामे होऊ देणार नसून यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी आज दिली.

पुणे महानगरपालिकेतील येवलेवाडी येथील विकास आराखडा तयार करताना सुरूवातीस जी आरक्षणे दाखवली होती परंतु नंतर पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जी आरक्षणे उठविण्यात आली. अशा सर्व आरक्षणांची सर्व्हे नं. सहीत व ती का उठविली गेली याची सविस्तर कारणासहीत संपूर्ण माहिती त्वरित दयावी, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी  प्रशासनाकडे केली आहे.

महापालिकेत कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम होऊ देणार नाही. येवलेवाडीच्या विकास आराखड्यात जर, चुकीचे बदल करुन आरक्षणे बदलली असतील अथवा काढली असतील तर, नगरविकास खात्याकडे व खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन हे चुकीचे प्रकार थांबविण्याचे काम मी करणार आहे, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले. महापालिका अधिकाऱ्याने जो डी.पी केला तोच मान्य केला जाईल , त्यासाठी कोणत्याही थराला जाईल  अस देखील संजय काकडे म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.