Pune : सैन्याच्या गस्त तुकडीचे डोळे व कान म्हणजे स्काऊट – निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे

शिवाजी कुल संस्थेचा १०१ वा वर्धापनदिन ; स्व-रुपवर्धिनी संस्थेला बाल-कार्य सन्मान प्रदान

एमपीसी न्यूज – नेतृत्व, चारित्र, ज्ञान याद्वारे जगाचे नेतृत्व करता येईल. हे गुण स्काऊट चळवळीमध्ये शिकविले जातात. स्काऊट आणि गाईडचे जनक बेडन पॉवेल हे सैन्याधिकारी होते. बेडन पॉवेल यांनी जी जीवनमूल्ये या चळवळीत घेतली, ती सैन्यावर आधारित आहेत. सैन्यामध्ये स्काऊट नावाची बटालियन आहे, ते अत्यंत महत्त्वाचे काम करतात. स्काऊट ही कल्पना सैन्यातील आहे. सैनिक जेव्हा गस्तीला जातात, त्यापुढे स्काऊट असतो. त्यामुळे सैन्याच्या गस्त तुकडीचे डोळे आणि कान हे स्काऊट असतात, असे मत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी केले. 

‘मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या १०१ व्या वर्षानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कुलरंग महोत्सवात स्व-रुपवर्धिनी संस्थेला बाल-कार्य सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे चेअरमन सुभाष जिर्गे, स्व-रुपवर्धिनी संस्थेचे ज्ञानेश पुरंदरे, उद्योजक रमेश जोशी, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर, नरेंद्र धायगुडे, शिवाजी कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रेया मराठे, समितीप्रमुख किर्ती कांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप होते. पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष आहे.

शशिकांत पित्रे म्हणाले, सौजन्यशीलता, प्रामाणिकपणा ही मूल्ये स्काऊटमध्ये आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहताना, मन व शरीराचा प्रचंड विकास होतो. तो विकास लहान मुलांचा व्हावा, याकरीता चळवळीचा उपयोग करण्यात आला. स्वत:ची स्वत: प्रत्येक गोष्ट मुलांना करायला लावून स्वावलंबनासारखे गुण नकळतपणे शिकविले जातात. पालकांनी अशा चळवळीमध्ये आजच्या पिढीतील मुलांना पाठवायला हवे.

सुभाष जिर्गे म्हणाले, बालविकासाच्या मुळाशी जाऊन काम करणारे पालक व संस्था कमी आहेत. हे काम तितकेसे सोपे नाही. प्रत्येकाला आपला मुलगा संस्कारित व्हावा, असे वाटते. मात्र धावपळीच्या जीवनात हे कठिण होत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत संस्कार कोणी करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकाळात श्री शिवाजी कुल आणि स्व-रुपवर्धिनी सारख्या संस्था संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे काम करीत आहे.

पुरस्काराला उत्तर देताना ज्ञानेश पुरंदरे म्हणाले, कै.किशाभाऊ पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्व-रुपवर्धिनीला बाल-कार्य सन्मान मिळाला, याचा आनंद आहे. स्काऊटची चळवळ ही जागतिक स्तरावर सुरु असलेली चळवळ आहे. स्काऊट चळवळीने जगामध्ये सर्व क्षेत्रात उमेदिने कार्य करणारे बालवीर व कार्यकर्ते उभे केले आहेत. त्यांचे हे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले. कुलवीरांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. पद्मजा लिमये, धनश्री कुंटे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.