National : शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव भासेल – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली. आणि म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचे नेतृत्व अटलजींच्या हाती आले. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

काँग्रेस पक्ष जवळपास अजिंक्य वाटत असताना, आणि राजकीय कारकिर्दीचा दीर्घ कालावधी विरोधी पक्षात बसून राजकारण करावं लागत असलं तरी कटुता, हेवेदावे, त्यांच्या व्यक्तिमत्वात आली नाही आणि दीर्घ कालावधीनंतर सत्तेत आल्यावर देखील त्यांच्या व्यक्तिमत्वातील शालीनता टिकून राहिली.

साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली, त्यांचं सुसंस्कृत राजकरण हे जवळून बघता आलं ह्याचा मला खरंच आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखले जाते. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.