Pimpri : ‘झेरॉक्स मशिन बंद, ऑपरेटर रजेवर’, म्हणून विषयपत्र छापले नाही; शिक्षण समितीचा अजब खुलासा 

शिक्षण समितीलाच शिक्षण देण्याची गरज; विरोधकांनी सुनावले खडेबोल 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात आल्यानंतर समितीच्या झालेल्या चारही सभा विषयपत्रिकाविना झाल्या आहेत. आयत्यावेळी विषय आणून मंजूर केले जातात. झेरॉक्स मशिन बंद असून ऑपरेटर रजेवर आहे. त्यामुळे विषयपत्र छापले नसल्याचा अजब खुलासा शिक्षण समितीने केला आहे. दरम्यान, समितीच्या सभापती विरोधकांवर अरेरावी करतात. आम्ही सभेला यायच्या अगोदर पहिल्या पाचच मिनिटामध्ये महत्वाचे विषय ‘झपटपट’ मंजूर करतात. भाजपचा हाच का तो पारदर्शक कारभार? असा सवाल राष्ट्रवादीच्या विनया तापकीर व शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्याच्या जागी दोन महिन्यापूर्वी शिक्षण समिती अस्तित्वात आली. समितीच्या  कामाची रुपरेषा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निश्चित केली आहे. त्यानंतर आजपर्यंत समितीच्या चार सभा झाल्या आहेत. परंतु, एकही सभेच्या विषयपत्रिकेवर प्रशासनाकडून विषय आणला गेला नाही अन् विषयपत्रिका देखील छापली नाही. शिक्षण समितीचे सुमारे 110 कोटीचे अंदाजपत्रक असताना झेरॉक्स मशिन आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याचे फुटकळ कारण दिले जाते. सत्ताधारी आयत्यावेळी विषय दाखल करुन बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतात, असा आरोप विरोधकांनी केला.

शिक्षण समितीची चौथी पाक्षिक सभा आज (गुरुवारी) पार पडली.  सभेला दोन वाजता सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य येण्याच्या अगोदरच महत्वाचे विषय केवळ पाच मिनिटामध्ये सत्ताधारी पक्षाने मंजूर केले. त्यामध्ये पालिकेच्या शाळेत अग्निरोधक यंत्र बसविणे, वॉटर फिल्टर बसविणे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अॅप’ विकसित करणे, मुख्याध्यापक परिषद भरविणे अशा विषयांचा समावेश होता. याबाबत विचारले असता कोणता विषय घ्यायचा हा माझा अधिकार आहे असे अरेरावीचे भाषा सभापती वापरत असल्याचा आरोप, नगरसेविका तापकीर व चिंचवडे यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनया तापकीर व शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी सांगितले की, शिक्षण समिती अस्तित्वात आल्यानंतर चार सभा झाल्या. परंतु, एकाही सभेचे विषयपत्रक छापण्यात आले नाही. आयत्यावेळी विषय मंजूर केले जातात. रितसर विषयपत्रिकेवर विषय आणले जात नाहीत. केवळ विषय मंजूर केले जातात. परंतु, त्याची अमंलबजावणी देखील होत नाही. केवळ घोषणा करुन प्रसिद्धी मिळविली जाते. पालिकेच्या शाळेत ‘कारगिल दिन’ साजरा करण्याचे जाहीर केले. परंतु, त्याची अंमलबजावणी देखील केली गेली नाही. त्याबाबतची माहिती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात आली.

अग्निरोधक यंत्र बसविणे हे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले असून हा जुणाच निर्णय आहे, असेही त्या म्हणाल्या. विरोधी पक्षाचे सदस्य सभेला येण्याच्या अगोदरच केवळ पाच मिनिटांमध्ये विषय मंजूर केले जातात. हाच का तो सत्ताधा-यांचा पारदर्शक कारभार असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला. समितीच्या सदस्यांना त्यांचे नेते देखील पाठिशी घालतात. सभापती विरोधकांवर अरेरावी करतात. आम्ही विरोधच करु असा गैरसमज त्यांनी करुन घेतला आहे, असेही त्या म्हणाल्या. शिक्षण समितीलाच शिक्षण देण्याची गरज आहे. तसेच विषय चांगले असतात. परंतु, त्यावर साधक-बाधक चर्चा झाली पाहिजे आणि रितसर विषयपत्रिकेवर विषय आणले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.