Pimpri News: महापालिकेकडून कचरा कुड्यांचाच कचरा; शहरातील 371 कचरा कुंड्या उचलल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग कचरा कुंडी मुक्त शहर उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या 371 कुंड्या उचलल्या जात आहेत. लाखो रुपयांच्या कुंड्याचाच कचरा केला जात आहे. अचानक कुंड्या उचलल्यामुळे कच-याची परिस्थिती जैसे थे आहे. नागरिक कुंडीच्या ठिकाणी, रस्त्यावर कुठेही कचरा टाकत आहेत. त्यामुळे कच-याचा प्रश्न गंभीर होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्योगनगरीत दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे 1 हजार ते 1100 मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. महापालिकेकडून दररोज कचरा संकलन करुन मोशी डेपोत नेला जातो.

महापालिकेने शहराच्या विविध भागात 371 सार्वजनिक कचरा कुंड्या ठेवल्या होत्या. नागरिक या कुंडीत कचरा टाकत होते. पण, कचरा कुंडी मुक्त शहरासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्वच कुंड्या उचलल्या जात आहेत. या कुंड्या क्षेत्रीय कार्यालयात ठेवल्या जात आहेत. कचरा संकलन करणा-या गाडीची वेळ निश्चित नसते. कधी सकाळी तर कधी दुपारी गाडी कचरा नेण्यासाठी येते. त्यामुळे नोकरदार, कामावार जाणा-या नागरिकांना कचरा गाडीत कचरा टाकता येत नव्हता. त्यामुळे नागरिक कुंड्यांमध्ये कचरा टाकत होते.

अचानक कुंड्या उचलल्यामुळे कचरा टाकण्याची गैरसोय होत आहे. परिणामी, नागरिकांकडून कुंड्याच्या ठिकाणी, रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कच-याची परिस्थिती जैसे थेच राहत आहे. दरम्यान, कचरा कुंड्या उचलल्याने नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारी येत आहेत. कचरा टाकण्याची अडचण होत असल्याचे नागरिक सांगतात. त्यावर महापालिका प्रशासन काय उपाय काढणार हे पाहणे महत्वाचे आहे.

सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, ”शहर कचरा कुंडी मुक्त करायचे आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या 371 कचरा कुंड्या उचलल्या जात आहेत. बैठी घरांमध्ये राहणा-या आणि नोकरीवर जाणा-या नागरिकांची कचरा टाकण्यात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी कचरा गाडीची वेळ, रुट बदलण्याचे नियोजन केले जात आहे. कचरा कुंडीच्या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी कर्मचारी नेमला जाईल किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. कचरा कुंड्या उचलल्यामुळे शहराबाहेरील कचरा शहरात टाकणा-याला अटकाव येईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.