Talegaon News: विस्कळीत पाणीपुरवठ्याने तळेगाव स्टेशन भागातील नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीवरील पंपहाऊसमधील दोन्ही पंप बिघडल्याने तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांना गेल्या चार-पाच दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अवेळी आणि विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे स्टेशन भागातील नागरिक हैराण झाले आहेत. काही भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न हाताळण्यास नगर परिषद प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सुमारे चार महिन्यांपासून पाणी पुरवठा विभागाकडे कायम स्वरुपी खाते प्रमुख नाही. अन्य अधिकाऱ्यांकडे खाते प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इंद्रायणी नदी पंप हाऊस या ठिकाणी 120 हॉर्सपॉवरचे दोन पंप आहेत. या पंपाच्या सहाय्याने स्टेशन भागात पाणी पुरवठा केला जातो. त्यातील एक पंप शुक्रवारी (दि.17) नादुरुस्त झाला. हा पंप वेळेत दुरुस्त केला गेला नाही. त्यातच चार दिवसांनी दुसरा पंपही बिघडला. त्यामुळे स्टेशन भागातील पाणीपुरवठा कोलमडला. पंप बिघडल्यानंतर पर्यायी दुसरा पंप असणे गरजेचे आहे. पण नगर परिषदेकडे तशी सोय नाही. दोन्ही पंप बिघडल्याने स्टेशन भागातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. सध्या नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, मात्र हा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे अनेक नागरिकांवर आर्थिक भुर्दंड सहन करीत खाजगी टँकरने पाणी घेण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाची कामे देखील आम्हीच करायची का – सुशील सैंदाणे

नगर परिषदेकडे विद्युत पंप व पाईप लाईन दुरुस्तीचा प्रदीर्घ अनुभव असलेले ठेकेदार आहेत, मात्र नगर परिषद प्रशासनाने त्यांना आद्यपी वर्क ऑर्डर दिलेली नाही. पूर्वीपासूनचे आमचे त्यांच्याशी असलेल्या वैयक्तिक चांगल्या संबंधामुळे लोकप्रतनिधींचा आदर म्हणून वर्क ऑर्डर नसतानाही ठेकेदार पंप व पाईप लाईन दुरुस्तीची कामे करतात. अनुभव व वैयक्तिक चांगल्या संबंधाच्या जोरावर पाणीपुरवठा विभाग कार्यरत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. प्रशासकीय आणि खाते प्रमुखांची कामे आम्हीच करायची का, असा संतप्त सवाल उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समिती सभापती सुशील सैंदाणे यांनी केला.

चार महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाकडे खाते प्रमुख नाही. स्टेशन भागातील पाण्याचा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे आहे. नादुरूस्त पंप वेळेत दुरुस्त करण्यासंर्भात सूचना देण्यात आली. मात्र नगर परिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. प्रशसानाने वेळेत ठेकेदारास पंप दुरुस्तीच्या सूचना केल्या असत्या तर पाणी टंचाईची ही वेळ आली नसती. खबरदारी घेऊन प्रशासनाने अजूनही पर्यायी पंपाची व्यवस्था करावी. जबाबदार विभाग प्रमुख नेमावा. स्टेशन भागात टँकरच्या सय्यायाने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनाकडे आग्रह धरला. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.