Pimpri : एक्स रे मशिन फुटल्याने चिमुकली भाजली

एमपीसी न्यूज – चिमुकल्या मुलीची एक्स रे तपासणी करत असताना एक्सरे मशिन फुटल्याने चिमुकली भाजली. ही घटना आज, गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

शार्वी भूषण देशमुख (वय 1) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शार्वीला युरिन इन्फेक्शन झाल्याने तिच्यावर मागील एक महिन्यापासून सांगवी येथील भालेराव चिल्ड्रन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. भालेराव हॉस्पिटलमधून शार्वीच्या पालकांना काही तपासण्या करण्यास सांगितले. हॉस्पिटलकडून पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर मधून तपासण्या करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार, शार्वीच्या पालकांनी तिला पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणले. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास शार्वीला तपासणीसाठी लॅबमध्ये घेतले.

मशिनमध्ये शार्वीची तपासणी सुरू असताना अचानक एक्स रे मशिनचा काही भाग फुटला. फुटलेल्या भागातून विशिष्ट प्रकारचे रसायन सांडले. हे रसायन शार्वीच्या अंगावर सांडले. त्यात शार्वी किरकोळ जखमी झाली. मशिनमधून धूर येत असताना तसेच रसायन सांडल्यानंतर सेंटरमधील कोणीही मदतीसाठी धावले नाही. उलट घटनेनंतर काहीही झाले नसल्याचे सांगत डॉक्टरांनी शार्वीच्या पालकांना परत लावले. सेंटरमधील डॉक्टरांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला असून कोणीही मदतीस आले नाही. ‘तुमच्या घरी झाले असते तर काय केले असते’ असे डॉक्टरांनी उद्धटपणे सांगितले असल्याचे शार्वीची आई प्रियंका यांनी सांगितले.

दरम्यान, ही घटना वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित असल्याने थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. याबाबतची कागदपत्र ससून रुग्णालयाच्या समितीकडे पाठविणार आहे. त्या समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यूक्‍लिअस डायग्नोस्टिक सेंटरचे अधिकारी गिरीश मोटे म्हणाले, “एक्‍स रे ट्यूब फुटल्याने त्यातील तेल अंगावर उडाले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत बाळाच्या अंगावर पाणी टाकून प्रथमोपचार केले. कोणीही बाळाच्या पालकांशी उद्धटपणे बोललेले नाही. तसेच या घटनेत आमच्याकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. हा केवळ एक अपघात आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.