Thergaon : धक्कादायक ! विवाहितेच्या शरीरात सोडले एचआयव्हीचे विषाणू

एमपीसी न्यूज – हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून घटस्फोटासाठी तिच्या शरीरात चक्क एचआयव्ही या घातक आजाराचे विषाणू सोडण्यात आले. ही घटना थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मे 2015 मध्ये विवाह झाला. त्यानंतर विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी आपसात संगनमत करून तिच्याकडे व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. सुरुवातीला विवाहितेने माहेरहून काही पैसे आणले. मात्र सासरच्या मंडळींची भूक आणखी वाढली त्यातून पैशांची मागणी आणखी वाढली.

वारंवार वाढत जाणा-या पैशांच्या मागणीपुढे हतबल होऊन विवाहितेने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिच्याकडे घटस्फोटासाठी वारंवार तगादा लावण्यात आला. मागील काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला आजारी होती, त्यावेळी तिच्या सलाईनमध्ये एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यातून विवाहित महिलेला एचआयव्हीची बाधा झाली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.