Pune : मल्टिप्लेक्स विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याला धमकी

एमपीसी न्यूज – मॉल, मल्टिप्लेक्स आदींकडून आकारण्यात येणा-या बेकायदेशीर पार्किंग शुल्क विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणा-या माहिती अधिकार कार्यकर्त्याला याचिका मागे घेण्यासाठी अज्ञातांकडून धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रफुल्ल पुरुषोत्तम सारडा (वय 31, रा. मार्केटयार्ड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल सारडा हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांनी पुणे शहरातील मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल, सांस्कृतिक हॉल यासारख्या ठिकाणी बेकायदेशीररित्या आकारल्या जाणा-या पार्किंग शुल्क विरोधात मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु ती प्रलंबित आहे.

ही याचिका दाखल केली म्हणून सारडा यांना एका लँडलाईन नंबरवरून एका अज्ञात इसमाने फोन करून हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घ्या नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे मॉल, मल्टिप्लेक्स विरोधातील याचिका ?

मॉल, मल्टिप्लेक्स, सांस्कृतिक हॉल यासारख्या ठिकाणी नियमानुसार ग्राहकांकडून पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी असून त्यासाठी त्यांना एफएसआय वाढवून दिलेला असतो. त्यामुळे ग्राहकांकडून पार्किंगसाठी शुल्क आकारणे हे बेकायदेशीर आहे. तरीही मॉल, मल्टिप्लेक्सच्या ठिकाणी हे शुल्क सर्रास आकारले जाते. याविरोधात सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.