अभेद्य कलावंतीण दुर्ग

(रिता शेटीया)

एमपीसी न्यूज- नवीन वर्षाची सुरवात काहीतरी हटके करावी, खूप अवघड म्हणून ट्रेक ओळखला जाणारा कलावंतीण दुर्ग सर करण्याचे निश्चित केले. तसा मला ट्रेकचा खूप अनुभव नाही. सिंहगड खूप वेळा पहिला. तिकोना एकदाच पहिला. पण ट्रेकिंग करायला खूप आवडते. त्याचवेळी बकेट लिस्ट ऍडव्हेंचर ग्रुप कलावंतीण दुर्ग ट्रेकला जाणार असल्याचे समजले. तेव्हाच या ग्रुपबरोबर जाण्याचे ठरवले.

6 जानेवारीला सकाळी 6 वाजता पुण्यातून ऋतुराज, ओम, मयुरेश, आशिष, साई कुमार, सुखेश, मनीषा, गौरी, नम्रता, रचना, सोनाली, खुशबू, अस्मिता, अर्चना, वैदेही,पूजा, प्रियांका आणि मी असा आमचा 18 जणांचा ग्रुप कलावंतीण दुर्गावर चढाई करण्यासाठी निघालो. गुगल मॅप असतानाही, रस्ता चुकल्याने सतत तीन वेळा यू टूर्न घेऊन अखेर आम्ही कलावंतीणच्या पायथ्यशी असलेल्या ठाकुरवाडी गावात पोहचलो. दुपारचे 11 वाजले होते.

पायथ्यापासून वर पहिले असता ऐकल्याप्रमाणे हा ट्रेक अवघड आहे असेच वाटले. इतर किल्ल्यांपेक्षा हा ट्रेक नागमोडी वळणे, अरुंद पाय-या असलेला. पण तितकाच निसर्ग सौंदर्याने डोळ्यांना तृप्त करणारा. हा किल्ला पश्चिम घाटामध्ये समुद्रसपाटीपासून 701 मीटर (2,300 फूट) उंचीवर आहे. भव्य दिव्य अश्या निसर्ग सौन्दर्याने नटलेला हा किल्ला अतिशय सुंदर आहे .

खडकामध्ये कोरलेल्या अरुंद पायऱ्या, एका बाजूला खोल दरी. पाय चुकला की कपाळमोक्ष ठरलेला. विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती, रंगबिरंगी फुले यांनी कलावंतीणचा परिसर नटलेला आहे. कलावंतीण चढण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. दुपार झाल्याने उशीर होऊ नये म्हणून सर्वानी गड चढायला सुरवात केली. हळू हळू सूर्य डोक्यावर आल्यामुळे प्रखर किरणांमुळे दमणूक होत होती. थंडीचे दिवस असले तरीही उन्हामुळे घामाघूम झालो होतो. झपाझप पावलं टाकत आम्ही पुढे निघालो. अखेर आम्ही दुपारी अडीच वाजता शिखरावर पोहोचलो. आम्हाला विश्वास बसत नव्हता. पण त्यावेळी आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर तो उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. दुर्गाच्या त्या उन्नत माथ्याला वंदन केले, मग काय आमचे फोटो सेशन सुरु झाले.

गडावर दीड तास मस्त वेळ घालवल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो, आता पुन्हा एकदा त्या अरुंद पायऱ्या उतरताना प्रत्येकाचाच कस लागणार होता, पण प्रत्येकाने एकमेकांना साहाय्य करत तो टप्पा पार केला. मधल्या टप्पावर लक्ष्मण काकांचे घर आहे, तेथेच जेवण करायला थांबलो. अगदी गावाकडील चुलीवरचे जेवण म्हटल्यावर, आम्ही सर्वानीच ताव मारला, जेवत असताना लक्ष्मण काकांनी सांगितले येथे दरवर्षी, सलमान खान देखील ट्रेकिंगला येतो, आणि अगदी सामान्य माणसाप्रमाणे येथे वावरतो. जेवण झाल्यावर पटापट आणि झपाझप पावले टाकत सर्व जण पायथाशी आलों. सायंकाळचे ६ वाजले होते, कलावंतीणच्या आणि प्रबळगडाच्या डोंगररांगाचा निरोप घेत, मस्त गरम – गरम चहा घेऊन आम्ही आमचे ट्रेकिंगचे क्षण एन्जॉय करत परतीच्या प्रवासाला लागलो.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like